*भुईमूगात हवामान सहनशील वाणांची निर्मिती होणे गरजेचे - उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव*

*भुईमूगात हवामान सहनशील वाणांची निर्मिती होणे गरजेचे - उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव*

*भुईमूगात हवामान सहनशील वाणांची निर्मिती होणे गरजेचे*

*- उपमहासंचालक डॉ. डी.के. यादव*

*राहुरी विद्यापीठ, दि. 22 एप्रिल 2026*

 अधिक उत्पादनक्षम वाण निर्मितीसाठी जीनोमिक निवड, प्रेडिक्टिव ब्रीडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्पीड ब्रीडिंग यांचा समावेश होतो. तसेच फेनोटिपिक व जेनोटिपिक क्षमता वाढविणे, अन्नद्रव्य व पाणी वापर कार्यक्षमता सुधारणे, आणि गुणवत्ताविषयक घटकांवर भर देणे महत्त्वाचे आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत टिकून राहण्यासाठी बहुगुणधर्मीय व हवामान-ताण सहनशील वाणांची निर्मिती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे पीक विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव यांनी केले. 

 राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय समन्वयित भुईमूग सुधार प्रकल्पाची तीन दिवसीय वार्षिक समूह बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी नवी दिल्ली येथील भा

रतीय कृषि अनुसंधान परिषदेचे पीक विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना बोलत होते. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर जुनागड येथील भारतीय भुईमूग संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस.के. बेरा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक दहाट उपस्थित होते.

 यावेळी डॉ. यादव पुढे म्हणाले की भारतामध्ये खाद्यतेलाची एकूण मागणी सुमारे 240 ते 260 लाख टन इतकी असून देशांतर्गत उत्पादन 100 ते 120 लाख टन इतके आहे. भारताने अन्नधान्य उत्पादनात 356.8 दशलक्ष टन इतकी उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून तेलबिया उत्पादन सुमारे 43 दशलक्ष टन आहे. तथापि, या प्रगतीनंतरही देश खाद्यतेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. विशेषतः शेंगदाणा पिकाच्या बाबतीत सुमारे 55% गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. ही तफावत कमी करण्यासाठी भारत सरकारने विविध तेलबिया विकास योजना राबवल्या असून सुमारे 35 बियाणे हब्जची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी जवळपास रु. 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प अंतर्गत अनेक आशादायक तंत्रज्ञान व सुधारित वाण विकसित करण्यात आले आहेत. मागील दशकात 70 पेक्षा अधिक शेंगदाणा वाणांची निर्मिती करण्यात आली आहे. संस्थात्मक स्तरावर अखिल भारतीय समन्वयित प्रकल्पाचे डिजिटलायझेशन, डीएनए फिंगरप्रिंटिंग, उत्पादन प्रोफाइल विकास, तसेच वाण चाचणी कालावधी तीन वर्षांवरून कमी करणे या उपाययोजना संशोधन कार्यक्षमता वाढवतील. याशिवाय संकरण कार्यक्रम आणि बेंचमार्किंग यांवर भर देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

 कुलगुरू डॉ. विलास खर्चे प्रमुख मार्गदर्शन करतांना म्हणाले की बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवामान अनुकूल तंत्रज्ञान, नवीन पिकांचे वाण, आधुनिक यंत्रसामग्री आणि शाश्वत शेती पद्धती विकसित करण्यासाठी विद्यापीठाचे संशोधन सुरू आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध पिकांचे 320 वाण, 55 हून अधिक यंत्रे आणि 2000 पेक्षा अधिक तंत्रज्ञान शिफारशी विकसित करून राज्याच्या कृषी विकासात मोठे योगदान दिले आहे. यासोबतच, विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी विस्तार यंत्रणा प्रभावीपणे कार्य करत असून महाराष्ट्र राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र वाढत असल्याने तेलबिया आणि तत्सम पिकाखालील क्षेत्र वाढण्यास अधिक वाव असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. एस. के. बेरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भुईमुग पिकावरील विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत बोडके यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यास आर्थिक व तांत्रिक सहाय्य भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय भुईमूग संशोधन संस्था जुनागड, गुजरात यांचे मार्फत करण्यात आलेले आहे. या बैठकीमध्ये देशातील विविध कृषी विद्यापीठांच्या संशोधन संस्था व केंद्रातील शास्त्रज्ञ सहभागी झाले असून भुईमूग पिकाच्या सुधारित वाणांची निर्मिती, उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन, हवामान बदलाचा परिणाम आणि शाश्वत शेती पद्धती यावर सखोल चर्चा करण्यात येत आहे. या बैठकीमध्ये देशातील 19 राज्यातून 150 हून अधिक शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सुर्यवंशी यांनी तर आभार डॉ. दीपक दहाट यांनी मानले.

  राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे