*टाकळीभान येथे खरीप पूर्व नियोजन,ऊस पीक व्यवस्थापन व मार्गदर्शन मेळावा संपन्न*

*टाकळीभान येथे खरीप पूर्व नियोजन,ऊस पीक व्यवस्थापन व मार्गदर्शन मेळावा संपन्न*

*राहुरी विद्यापीठ, शनिवार,दि. 30 मे, 2026*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे खरीप पूर्व नियोजन, ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व हुमणी अळीचे नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील, मृदशास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके, कृषि अधिकारी श्रीमती पौर्णिमा गाडे, कृषि सहाय्यक श्री. शेषराव देशमुख व प्रगतशील शेतकरी श्री. जयकर मगर उपस्थित होते.

        याप्रसंगी डॉ. विजयकुमार पाटील यांनी माती परीक्षणाचे महत्व सांगताना माती परीक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, जमिनीतील चुनखडीचे प्रमाण या त्रिसूत्रीच्या आधारे जमिनीच्या आरोग्याचे मूल्यमापन करता येते याबाबत मार्गदर्शन केले. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत असल्याबाबत निरीक्षण नोंदवून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कसे वाढवता येईल याविषयी माहिती दिली. आदर्श शेणखत कसे तयार करावे, कंपोस्ट खत, हिरवळीच्या खतांचा व जिवाणू खतांचा वापर करून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याच्या उपाययोजना सांगितल्या. जमिनीचा पोत सुधारून जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढल्यास पिकांना उपलब्ध अन्नद्रव्य मिळण्यास मदत होऊन उत्पादनात वाढ होईल असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीतील मातीचे नमुने विद्यापीठातून तपासून घ्यावीत त्याचप्रमाणे विद्यापीठाकडे उपलब्ध असलेली द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये, जिवाणू खते वापरावीत असे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले. डॉ. सुभाष घोडके यांनी ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि हुमणी अळीचे नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन करताना ऊस पिकाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने रासायनिक खते वापराची वेळापत्रक, सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, कंपोस्ट खते, हिरवळीचे खते, जिवाणू खते इत्यादी खतांचा एकात्मिक वापर करून अपेक्षित उत्पादन कसे घ्यावे याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी हुमणी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी या अळीच्या वाढीच्या अवस्था समजावून सांगितल्या. हुमणी अळीचे एकात्मिक नियंत्रण करण्याविषयी भौतिक नियंत्रण म्हणजेच अळीचे कोश भुंगेरे गोळा करणे त्याचबरोबर मशागतीने नियंत्रण करणे तसेच जैविक नियंत्रण व रासायनिक नियंत्रण याबाबत उपाययोजना सुचविल्या. यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी श्री. आचपाळे यांनी बियाणे उगवणक्षमता प्रात्यक्षिक सादर केले तर सहाय्यक कृषी अधिकारी श्री. आदिनाथ धुमाळ यांनी सोयाबीन पिकातील रुंदवाफा सरी पद्धतीने पेरणीचे फायदे सांगितले. श्री. अवधूत मेहत्रे यांनी बीजप्रक्रिया कशी करावी याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी परिसरातील प्रगतशील शेतकरी श्री. भाऊसाहेब पठारे, श्री. यशवंतराव रणनवरे, श्री. राजेंद्र कोकणे, श्री. शिवाजीराव धुमाळ, श्री. विनोद बोडके यांच्यासह कृषी महाविद्यालय, भानसहिवरे येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषीदूत अवधूत घाडगे, प्रसाद धिरडे, गणेश घाडगे आदींनी सहभाग घेतला.