अहमदनगर जिल्ह्यातील बेकायदेशीर शिक्षक भरती विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाची आक्रमक भूमिका,तात्काळ कारवाईबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन .

अहमदनगर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक विभागात शिक्षक भरतीचा मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसू लागलेली आहेत .जिल्ह्यातील काही संस्थाचालकांनी व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाची कुठलीही जाहिरात अवैध शिक्षक भरती केल्याचे निदर्शनात येत आहे .हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने दंड थोपटले असून त्यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे .
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाप्रमाणे दि . 02/05/2012 पासून आज पर्यंत कोणतेही नवीन पद भरण्यास व पद भरती बाबत जाहिरात देण्यास परवानगी नसतानाही मा. प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर व उपसंचालक माध्यमिक शिक्षण विभाग पुणे यांचे संगणमताने श्री .शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये बेकायदेशीर शिक्षक भरती पूर्ण करण्यात आलेली आहे .
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील विविध विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्षे 2016/17 च्या हजेरी पुस्तकामध्ये बॅक डेटेड सह्या घेण्यात येऊन नियमबाह्य विषयाचे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे .प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष 2019/20 मध्ये कामावर हजर कर्मचारी शैक्षणिक वर्ष 2016/17 मध्ये हजर दाखवून शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली असून वैयक्तिक वेतनश्रेणी मान्यताही देण्यात आली आहे .
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गणित ,विज्ञान ,इंग्रजी या विषयाचे शिक्षक भरती करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र मराठी , समाज अभ्यास विषयाच्या शिक्षकांना नियुक्ती व मान्यता देण्यात आली आहे .यात सर्वात विशेष म्हणजे यातील एक शिक्षक एकाच कालावधीमध्ये तालुक्यातील दोन शाळेमध्ये कार्यरत होते .या सर्व गोष्टींचा उल्लेख शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केल्याचे दिसून आले आहे .
सध्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात असून टीईटी परीक्षा व शिक्षक भरती बाबत झालेले घोटाळे महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत .अहमदनगर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरतीच्या भ्रष्टाचाराबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी, जिल्हाउपाध्यक्ष देविदास येवले,तालुका उपप्रमुख प्रशांत पवार यांनी या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घातले असून या प्रकरणाचे पितळ उघडे होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे .
येत्या दहा दिवसाच्या आत संबंधी शिक्षकांच्या मान्यता रद्य करण्यात याव्यात तसेच बेकायदेशीर शिक्षक भरतीस कारणीभूत सर्व व्यक्तींवर महाराष्ट्र शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी व कारवाई न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद अहमदनगर येथे प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे .