उद्योजगतेतून समाजाचाही विकास साधावा -विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे.

उद्योजगतेतून समाजाचाही विकास साधावा -विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे.

*राहुरी विद्यापीठ, दि. 12 फेब्रुवारी, 2025*

 डाळ मिलिंग प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाचा फायदा घेवून आपला स्वतःचा उद्योग सुरु करावा. उद्योग सुरु केल्याने स्वंय रोजगाराबरोबर इतरांनाही रोजगार मिळतो. जास्तीत जास्त युवा उद्योजक तयार व्हावेत हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. उद्योजकतेतून स्वतः बरोबर समाजाचाही विकास साधता येतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील विस्तार शिक्षण संचालनालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय डाळ मिलिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, नॅशनल अॅग्रो फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत देवरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विलास साळवे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. सचिन सदाफळ व जनसंपर्क अधिकारी डॉ. भगवान देशमुख उपस्थित होते. 

 डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की मानवी आहारात डाळिंचे महत्व अनन्यसाधारण आहे. डाळी प्रथिनांचा मुख्य स्त्रोत आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार प्रत्येकाच्या आहारात दररोज 60 ग्रॅम प्रथिनांचा समावेश असल्यास आपले आरोग्य चांगले राहते. डाळमिल या क्षेत्रातील उद्योजकांनी विपणनाच्या बाबतीत अधिक दक्ष राहिले पाहिजे. विपणनामध्ये आपल्या मालाच्या ग्रेडींग, पॅकेजींग व ब्रँडींग या बाबी महत्वाच्या आहेत. यावेळी डॉ. रविंद्र बनसोड म्हणाले की कडधान्य पिकांच्या काढणी पश्चात हाताळणीमध्ये 20 ते 30 टक्के नुकसान हे प्रक्रिये अभावी होते. त्यामुळे कडधान्य पिकांमध्ये डाळिंवरील प्रक्रिया ही आवश्यक आहे. प्रत्येक उद्योगात आवड, ज्ञान व गुणवत्ता असणे गरजेचे असल्याचे यावेळी ते म्हणााले. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास साळवे यांनी तर आभार डॉ. विक्रम कड यांनी मानले. दोन दिवस चालणार्या या प्रशिक्षणामध्ये डाळमिल प्रशिक्षण तसेच डाळ प्रक्रिया युनिटला प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष तसेच त्यांचे प्रतिनीधी यांचेसह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवा शेतकरी सहभागी झाले आहेत.