नेवासा तालुक्यातील चांदा येथील गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष,अधिकाऱ्यांची मात्र मूग गीळ्याची भूमिका..

नेवासा तालुक्यातील चांदा येथील गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष,अधिकाऱ्यांची मात्र मूग गीळ्याची भूमिका..

चांदा येथे गॅस एजन्सीच्या मनमानीमुळे ग्राहक त्रस्त; वेळेवर रिफिल न मिळाल्याने संताप:

१५-२० दिवस प्रतीक्षा करूनही सिलिंडर मिळत नाही; जादा दराने विक्रीचा आरोप

सोनई | प्रतिनिधी :

नेवासा तालुक्यातील चांदा येथील हेमलता गॅस एजन्सीच्या कामकाजाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर (रिफिल) मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, एजन्सीकडून नियमितपणे गॅस पुरवठा होत नसून अनेक ग्राहकांना १५ ते २० दिवस उलटूनही रिफिल मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन स्वयंपाकासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, व्यावसायिक (कमर्शियल) ग्राहकांना जादा दराने गॅस सिलिंडर विक्री केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच, गॅस वितरणासाठी येणाऱ्या गाड्या वेळेवर न आल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

गॅस एजन्सीकडून रिफिल मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे काही नागरिकांना रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असून, त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या महिनाभरापासून ही समस्या अधिक तीव्र झाली असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांना नियमित व सुरळीत गॅस पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.