*मराठी भाषा संवर्धन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकचळवळ व्हावी*
*- सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे*
*राहुरी विद्यापीठ, दि. 30 जानेवारी, 2023*
मातृभाषेला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. ती मानसिक, सामाजिक व सांस्कृतीक विकासाबरोबरच लोकांमध्ये ऐकमेकांप्रती जिव्हाळा व आत्मियता वाढविते. त्यामुळे आपल्या मराठी मातृभाषेचे संवर्धन व सशक्तीकरण होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता ती एक लोकचळवळ बनावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी केले.
पदव्युत्तर महाविद्यालयामधील मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. बापुसाहेब भाकरे बोलत होते. यावेळी हळगांव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, तंत्र अधिकारी डॉ. सुनिल भणगे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे मराठी भाषा अधिकारी डॉ. मनोहर धादवड, तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ. महेश पाटील उपस्थित होते.
डॉ. बापुसाहेब भाकरे पुढे म्हणाले मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात वापर, प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. कृषि तज्ञ व पदवीधरांनी आपले संशोधन, तंत्रज्ञान व शोधनिबंध मराठीमध्ये जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहचवून या लोकचळवळीस हातभार लावावा. यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की जागतिकीकरणामध्ये इंग्रजी भाषा महत्त्वाची असली तरी मराठी भाषेचा जागर होणे, तिचे संवर्धन होणे सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी मराठी वाड्मय साहित्य वाचणे व वाचन संस्कृती वृध्दिंगत करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. याप्रसंगी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कालावधित आयोजीत निबंध लेखन, सारांश लेखन व मराठी अनुवाद या स्पर्धेंतील विजेत्या विद्यार्थ्यांचा डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी आदित्य आंधळे, पल्लवी ठक्कर, अजय सदर, सोनाली घोगरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोहर धादवड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिल भणगे यांनी तर आभार प्रदर्शन श्री राजूदास राठोड यांनी केले. या कार्यक्रमासाठी पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारोप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. किरण शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.