शेतमालाचे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होणे गरजेचे -विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी . एस. पाटील .
*शेतमालाचे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु होणे गरजेचे*
*- विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील*
*राहुरी विद्यापीठ, दि. 31 ऑगस्ट, 2023*
शेतकर्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव हवा असेल तर शेतमालावर प्रक्रिया करणार्या उद्योजकांचे जाळे तयार करावे लागेल. फळे तसेच भाजीपाला या नाशवंत मालाला ठरावीक वेळेत बाजारपेठ उपलब्ध झाली तरच त्याचा योग्य तो परतावा उत्पादक शेतकर्यांना मिळतो. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु झाले तरच शेतकर्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळू शकेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाने आयोजीत केलेल्या एक महिना कालावधीच्या 37 व्या फळे व भाजीपाला प्रक्रिया प्र्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ. पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे व अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड उपस्थित होते.
डॉ. सी.एस. पाटील आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की शेतमालावर प्रक्रिया करुन तयार केलेल्या मालाचे विशेष मानांकन लक्षात घेवून तसेच त्याचे मुल्यवर्धन केले तर शेतकर्यांना अधिकचे उत्पन्न मिळेल. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी स्वतःचे उद्योग सुरु करुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना केले. डॉ. दिलीप पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की प्रशिक्षणार्थींनी भविष्यात ग्रामीण भागात उद्योग उभारुन आपल्या उत्पादित मालाचा एक ब्रँड तयार करावा. त्याला गावातीलच नामवंत अथवा प्रसिध्द ठिकाणाचे नांव देवून तो ब्रँड आपल्या मेहनतीने नावारुपाला आणावा. छोटी छोटी यंत्रे वापरुन नवनविन पदार्थ तयार करण्याला प्राधान्य देणे हिताचे ठरेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी या प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थी सौ. अश्विनी पागिरे, श्री. राजेंद्र देशमुख व श्री. ज्ञानदेव पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत 5-5 जणांच्या चमुने तयार केलेल्या पेरु पानाची पावडर, आवळ्यापासुन तयार केलेले चॉकलेट बॉल, तृणधान्य व कडधान्यापासून तयार केलेले मोदक तसेच शेव, नागली व शेंगदाणे वापरुन तयार केलेली चिक्की या पदार्थांचा मान्यवरांनी आस्वाद घेवून कौतूक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रम कड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल घुगे यांनी तर आभार श्री. गोरक्षनाथ चौधरी यांनी मानले. या एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी विविध जिल्ह्यातून 30 प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. यावेळी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.