भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन प्रकल्पाला यांत्रीकीकरणाची जोडद्या- कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील.
*राहुरी विद्यापीठ, दि. 30 ऑगस्ट, 2023*
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागातील भाजीपाला संशोधन योजनेच्या प्रक्षेत्रावर शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य श्री. दत्तात्रय उगले, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के.ई. लवांडे, तसेच संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. एस.एन. पाटील, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भगवान ढाकरे, भाजीपाला विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि भाजीपाला विभागातील निवृत्त अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. पी.जी. पाटील आणि सर्व अधिकार्यांनी संशोधन प्रकल्पाची पाहणी केली. याप्रसंगी कुलगुरु म्हणाले भाजीपाला प्रकल्पाने भाजीपाला संशोधनामध्ये मोठे काम केलेले आहे. आता येथून पुढे या प्रकल्पाने प्रक्षेत्राच्या यांत्रिकीकरणावर भर देणे गरजेचे आहे.
वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. भरत पाटील माहिती देतांना म्हणाले या प्रकल्पाला 50 एकर क्षेत्र आहे. या प्रक्षेत्रावर दोडका, दुधी भोपळा, घोसाळी, काकडी या वेलवर्गीय भाजीपाला पिके तसेच कांदा, भेंडी, वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर, चवळी, वाल, टिंडा, झुकिनी या पिकांची लागवड केलेली आहे. त्याचप्रमाणे कांदा पिकाची यंत्राच्या साहाय्याने लागवड केलेली असून संपूर्ण प्रक्षेत्रावर प्लास्टिक अच्छादन व ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब केलेला आहे. या प्रकल्पाने आत्तापर्यंत एकूण 54 विविध भाजीपाला पिकांचे वाण विकसित केलेले असून येणार्या काळात भोपळा, दोडका, चवळी, भेंडी या पिकांचे सुधारीत आणि संकरित वाण विकसित करण्यात येणार आहेत. भाजीपाला संशोधन प्रकल्पात सुरु असलेल्या प्रयोगाबाबत तसेच केलेल्या पायाभूत सुधारणाबाबत कुलगुरूंनी समाधान व्यक्त केले.