20 वी विस्तार शिक्षण परिषद बैठक संपन्न, फायदेशीर शेतीसाठी गटशेती हा उत्तम पर्याय - कुलगुरू - डॉ . पी . जी . पाटील
*20 वी विस्तार शिक्षण परिषद बैठक संपन्न*
*फायदेशीर शेतीसाठी गटशेती हा उत्तम पर्याय*
*- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*
*राहुरी विद्यापीठ, दि. 14 मार्च, 2024*
शेतीमधील निविष्ठांचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकर्यांनी गट स्थापन करुन या गटाद्वारे कृषि निविष्ठा मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास त्यांना कृषि निविष्ठा या सवलतीच्या दरात मिळतील. बदलत्या हवामानामुळे व रासायनिक खते आणि पाण्याच्या अती वापरामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी होऊन त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. यासाठी शेतकर्यांनी शेतीला दुग्धव्यवसायाची जोड द्यावी व जनावरांपासून मिळणार्या सेंद्रिय खतांचा वापर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी करावा. शेतकर्यांनी सदैव प्रयोगशील रहावे व आपल्या शेतीत नवनविन प्रयोग करावे. कृषि निविष्ठांची सवलतीच्या दरात खरेदी व कृषि उत्पादनांची योग्य भावात विक्री करायची असेल तर फायदेशीर शेतीसाठी गटशेती हा उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात 20 व्या विस्तार शिक्षण परिषद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, विस्तार शिक्षण परिषदेचे तज्ञ शेतकरी सदस्य श्री. भाऊसाहेब जाधव, श्री. समाधान पाटील, श्री. सर्जेराव पाटील, श्री. बाळासाहेब आढाव उपस्थित होते.
याप्रसंगी शेतकरी सदस्य श्री. सर्जेराव पाटील म्हणाले की कृषि विद्यापीठाचे संशोधन हे उच्च दर्जाचे असून विद्यापीठाचे विविध पिकांचे वाण हे भरघोस उत्पादन देणारे आहे. विद्यापीठ विकसीत वाण, निविष्ठा, विद्यापीठाचे प्रकाशने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध व्हावेत. श्री. भाऊसाहेब जाधव यांनी अॅव्हाकॅडो, खजुर यासारख्या नविन पिकांवर संशोधन होण्याची गरज व्यक्त केली. श्री. समाधान पाटील यांनी कपाशीवरील किड नियंत्रणावर अधिक संशोधन होण्याची गरज व्यक्त केली. श्री. बाळासाहेब आढाव यांनी विद्यापीठात सुरु असलेल्या नवनविन उपक्रमांबाबत तसेच संशोधनाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. चिदानंद पाटील यांनी 19 व्या विस्तार शिक्षण परिषदेचा इतिवृत्तांत आणि विस्तार शिक्षण उपक्रम अहवाल सादर केला. याप्रसंगी डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. विठ्ठल शिर्के यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे तर सदस्यांची ओळख डॉ. भगवान देशमुख यांनी करुन दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ तर आभार डॉ. गोकुळ वामन यांनी मानले.