औषधी व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान या विषयावरील एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न .
*औषधी व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान या विषयावरील एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
*राहुरी विद्यापीठ, दि. 19 मार्च, 2024*
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित औषधी, सुंगधी वनस्पती व पानवेल संशोधन प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसुचित जाती उप योजेनेअंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गासाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम भोकर, ता. श्रीरामपूर येथे संपन्न झाला. या शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आण्णासाहेब नवले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. आण्णासाहेब नवले यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींचे महत्व व सेंद्रिय शेतीसाठी जैविक खतांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले तसेच औषधी व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
यावेळी पानवेल संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय गावडे यांनी विविध औषधी वनस्पतींचे लागवड तंत्रज्ञान व त्यांचे औषधी गुणधर्म याबाबत मार्गदर्शन केले. या प्रकल्पाचे किटक शास्त्रज्ञ प्रा. भारत पवार यांनी औषधी वनस्पतींवर येणारे विविध किटक व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत शेतकर्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा. धनश्री पाटील यांनी सुगंधी पिके लागवड तंत्रज्ञान व त्यांचे औषधी गुणधर्म याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थीना ट्रेनिंग किट व औषधी वनस्पतींची रोपे वाटप करण्यात आले. प्रा. धनश्री पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमात 150 पेक्षा जास्त महिला शेतकर्यांनी सहभाग नोंदवला. आशांकुर केंद्राच्या संचालिका प्रिस्का मॅडम व त्यांचे सर्व सहकारी यांचे या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.