शिवचरित्र म्हणजे तरुणांचे उर्जा स्त्रोत्र. प्रभारी कुलगुरू डॉ.सत्ताप्पा खरबडे.

शिवचरित्र म्हणजे तरुणांचे उर्जा स्त्रोत्र. प्रभारी कुलगुरू डॉ.सत्ताप्पा खरबडे.

 

*राहुरी विद्यापीठ, दि. 19 फेब्रुवारी, 2025* 

            लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवाजी राजे म्हणजे प्रजावत्सल, लोक कल्याणकारी, बहुजन प्रतिपालक, सर्वधर्मसमभाव जपणारे, सर्वांना समतेची वागणूक देणारे असे राजे होते. छत्रपतींचे आचार व विचार आपण आपल्या आचरणात आणावे. छत्रपतींचे कार्य हे इतके अफाट होते की शिवचरित्र अजूनही तरुणांचे ऊर्जा स्रोत आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले. 

        महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवाचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल व विद्यापीठ क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते. 

         यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. विकास नवाळे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे पहिले राजे होते. शिवचरित्र आपल्याला निष्ठा, धैर्य, पराक्रम, प्रामाणिकपणा, कष्ट, नियोजन शिकविते. शिवाजी राजांनी चारशे वर्षांपूर्वी बरेच उपक्रम सुरू केले. यामध्ये समाजकारण, राजकारण, कृषीकारण इ. चा समावेश होतो. त्यांनी जमिनीची मोजणी, जमिनीच्या मातीनुसार प्रतवारी इत्यादी उपक्रम सुरू केले. स्वच्छता अभियानाचे प्रवर्तक शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारी माणसे गोळा करून स्वराज्य स्थापनेचे महत्त्वाचे कार्य केले. आजच्या काळातील समाजातील प्रत्येक समस्येला शिवचरित्र हे उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या जीवनाचे रणांगण केले. शिवचरित्र हे फॅशनचा विषय नसून हृदयातील पॅशनचा विषय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्त्रियांचा सन्मान, व्यसनमुक्त जीवन, आई-वडिलांचा आदर व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्य करणे म्हणजेच शिवचरित्र अंगीकारणे होय असे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्याची ओळख डॉ. महावीरसिंग चव्हाण यांनी केले. याप्रसंगी राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. ज्ञानेश्वर ठोंबरे, पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे, विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. विजय पाटील उपस्थित होते. यावेळी राहुरी येथून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या शिवज्योतीचे पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदव्युत्तर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी श्रद्धा सनस व स्नेहल माळी यांनी तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी व पदव्युत्तर महाविद्यालयाचे तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.