उसामध्ये चाबूक कानी रोग प्रतिकारक्षम जननद्रव्यांची नोंदणी करणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशातील एकमेव कृषी विद्यापीठ - कुलगुरू डॉ . पी . जी . पाटील .

उसामध्ये चाबूक कानी रोग प्रतिकारक्षम जननद्रव्यांची नोंदणी करणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशातील एकमेव कृषी विद्यापीठ - कुलगुरू डॉ . पी . जी . पाटील .

*उसामध्ये चाबूक काणी रोग प्रतिकारक्षम जननद्रव्यांची नोंदणी करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ देशातील एकमेव कृषि विद्यापीठ*

*- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*

*राहुरी विद्यापीठ, दि. 23 डिसेंबर,2023*

             महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे की ज्यांनी उसावरील चाबूक काणी रोगासाठी प्रतिकारक्षम स्रोत म्हणून सन 2016 मध्ये को एम 7601, एम एस 7604 या दोन आणि सन 2023 मध्ये को एम 11086 व को एम 13083 अशा एकूण चार जननद्रव्यांची (जर्मप्लाझम) राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन ब्युरो, नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या जननद्रव्य संरक्षण विभागात नोंदणी केली आहे अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी. जी. पाटील यांनी दिली. 

            मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव हे राहुरी कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असून भारतातील ऊस संशोधनामध्ये काम करणार्या संस्थेपैकी एक अग्रेसर केंद्र आहे. या केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे 16 पेक्षा जास्त वाण, 105 पेक्षा जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी अद्ययावत शिफारशी व तंत्रज्ञान दिले असून सध्या महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास 85 टक्के क्षेत्रावर या संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या वाणांची लागवड व ऊस तंत्रज्ञान शिफारशींचा शेतकर्यांकडून अवलंब केला जात आहे.

           उसामध्ये चाबुक काणी हा सर्वात गंभीर व हानिकारक असा बुरशीजन्य रोग असून रोगाचा प्राथमिक प्रसार रोगग्रस्त बियाणे वापरल्यामुळे तसेच त्याचा दुय्यम प्रसार रोगांच्या बिजानूमार्फत, पाणी अथवा हवेमार्फत होतो. चाबूक काणी रोगाचा प्रादुर्भाव ऊस लागवडीखालील प्रचलित वाणांमध्ये झाल्यास त्याचा मोठा विपरीत परिणाम उसाच्या उत्पादन, साखर उतारा आणि रसाच्या शुद्धतेवर होतो. चाबुक काणी रोगामुळे लागण व खोडवा ऊस पिकाचे उत्पन्न 29 ते 70% पर्यंत, साखर उतारा चार टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता असते. रसाची शुद्धता घटल्यामुळे गुळाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन गुळाची प्रतवारी कमी मिळते. भूतकाळात लागवडीखाली असणार्या को 740 व को 7219 यासारख्या जास्त उत्पादन व साखर उतारा देणारे उत्कृष्ट वाण चाबुक काणी रोगाला मोठ्या प्रमाणावर बळी पडल्यामुळे त्यांचे लागवडी खालील क्षेत्र कमी झाले आहे. चाबूक काणी रोगापासून ऊस पिकाचे शाश्वत रोग व्यवस्थापन करताना प्रतिबंधक उपाय म्हणून रोगप्रतिकारक्षम वाणांचा विकास व लागवड हा सर्वात विश्वासार्ह पर्यावरण पूरक आणि उपयुक्त उपाय आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्र, पाडेगाव येथे 1932 पासून चाबूक काणी रोग प्रतिकारक्षम ऊस वाणांची ओळख, त्याचे मूल्यमापन व संशोधन करण्याचे काम अविरतपणे चालू आहे. नवीन व्यवसायिक वाण शेतकर्यांसाठी शिफारस करण्यापूर्वी नवीन वाणांची चाबुक काणी, लाल कुज व मर रोगास प्रतिकारक क्षमता तपासणे ही वाण निवड निकषांपैकी एक आहे तसेच वाणांमध्ये चाबुक काणी रोग संसर्ग लवकर ओळखण्यासाठी आण्विक आधारित शोधतंत्रासह प्रजनन आणि विविध क्षेत्रिय चाचणी कार्यक्रमांचा अवलंब केला जातो. कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत वाढ केलेल्या बुरशीची नवीन उसाच्या प्रजातींवर बीज प्रक्रिया करून उसामध्ये सदर रोगास प्रतिकारक्षम असलेबाबत ओळख व मूल्यमापन करण्याचे काम राज्यस्तरीय व अखिल भारतीय ऊस समन्वित योजनेअंतर्गत उष्णकटिबंधीय द्वीपकल्पीय विभागात चालू असते. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी सांगितले की पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने शेतकरी व साखर कारखाने यांच्या प्रगतीकरिता निरंतर प्रयत्नशील राहून संशोधनातून शेतकर्यांसाठी रोग व कीड प्रतिकारक्षम असलेल्या वाणांची निर्मिती करण्यावर भर दिला आहे.

             मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी सांगितले की अखिल भारतीय स्तरावर कोईमतूर येथे संशोधन केंद्रामार्फत राधानगरी व पाडेगाव येथे चालू असणार्या संकरीकरण कार्यक्रमात चाबुक काणी रोगास प्रतिकारक्षम प्रजातीय स्रोत वापरून उसाचे जास्त उत्पादन व साखर उतारा असणार्या वाणांची निर्मिती बरोबर चाबुक काणी प्रतिकारक्षम नवीन वाण तयार करण्यात येतील. संशोधन केंद्रात कार्यरत असलेले ऊस रोग शास्त्रज्ञ व सदरचा जर्मप्लाझम नोंद करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले डॉ. सुरज नलावडे यांनी सध्याच्या अभ्यासातून चाबुक काणी विरुद्ध प्रतिकारक्षम स्रोत उसामध्ये उपलब्ध असून त्याचा वापर नवीन उच्च उत्पन्न देणार्या ऊस वाणांच्या उत्क्रांतीसाठी प्रजनन कार्यक्रमात केला जाऊ शकतो अशी पुष्टी दिली. पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.