भविष्यातील बदलत्या हवामानामध्ये ऊस शेतीतील आव्हाने पेलण्यासाठी सुधारित ऊस वाणांची निर्मिती करा - कुलगुरू डॉ . पी .जी . पाटील

भविष्यातील बदलत्या हवामानामध्ये ऊस शेतीतील आव्हाने पेलण्यासाठी सुधारित ऊस वाणांची निर्मिती करा - कुलगुरू डॉ . पी .जी . पाटील

*भविष्यातील बदलत्या हवामानामध्ये ऊस शेतीमधील आव्हाने पेलण्यासाठी सुधारित ऊस वाणांची निर्मिती करा*   *-कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील* 

 

 *राहुरी विद्यापीठ, दि. 20 एप्रिल, 2024*

 

           पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विद्यापीठाच्या स्तरावर सन २०२२ यावर्षीचा उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार प्राप्त केला असून या केंद्राने ऊस बेणे विक्रीतून सर्वात जास्त विद्यापीठ महसूल मिळवून दिला आहे. भविष्यातील बदलत्या हवामानामध्ये भारतीय ऊस शेतीमधील आव्हाने पेलण्यासाठी सुधारित ऊस वाणांची निर्मिती करावी तसेच महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या केंद्राने चांगले मूलभूत बियाणे तयार करावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे भेट दिल्यानंतर संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे व पुणे कृषी महाविद्यालयातील मृदा शास्त्रज्ञ डॉ.धर्मेंद्रकुमार फाळके उपस्थित होते. 

 

          यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की पाडेगाव संशोधन केंद्राने उसावरील चाबूक काणि रोगासाठी प्रतिकारक्षम स्त्रोत म्हणून सन 2016 मध्ये कोएम 7601 एम एस 7604 या दोन आणि सन 2023 मध्ये कोएम 11086 व कोएम 13082 अशा एकूण चार जननद्रव्यांची राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन ब्युरो, नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या जननद्रव्य संरक्षण विभागात नोंदणी केली. याबद्दल तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल करण्याचे मूलभूत काम येथे होत असल्याबद्दल मी सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी ऊस संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या संशोधन केंद्राने प्रसारित केलेल्या 16 वाणांची माहिती देऊन या वाणांचे देशासाठी आणि राज्यासाठी असलेले योगदान, आजपर्यंत झालेल्या संशोधनातून उसाच्या वाणांबरोबरच उसाच्या लागवड पद्धती, छोट्या शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धती, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, तणनाशकांचा वापर, आंतरपिके, पाणी व्यवस्थापन, पाचट ठेवून ऊस खोडवा व्यवस्थापन तसेच उसावरील किडी व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन यासंबंधी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या 105 मोलाच्या शिफारशींपैकी महत्त्वाच्या शिफारशींची माहिती विषद केली.

 

       यावेळी कुलगुरूंनी या संशोधन केंद्रामध्ये काम करणारे ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे, ऊसशरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, मृदशास्त्र विभागातील डॉ. कैलास काळे, ऊस कीटकशास्त्रज्ञ प्रा. शालिग्राम गांगुर्डे, ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. दत्तात्रय थोरवे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. किरणकुमार ओंबासे व डॉ. माधवी शेळके यांचे बरोबर संवाद साधला. यावेळी कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील यांनी या संशोधन केंद्रावर घेण्यात आलेल्या प्रयोगांना, ऊस बेणे मळ्यास तसेच या संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन वाणांच्या प्लॉटला भेट दिली. 

 

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, पुणे यांच्याकडून पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रास एक 21 एचपी कुबोटा ट्रॅक्टर व रोटावेटर, पेरणी यंत्र, सारायंत्र, नांगर व रीजर अशी पाच अवजारे भेट म्हणून देण्यात आली होती. यावेळी या कुबोटा ट्रॅक्टर व पाच अवजारांचे पूजन कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी तर आभार डॉ. सुरेश उबाळे यांनी मानले. या भेटी वेळी संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.