सन्मान अतिथींचा,सन्मान गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा तसेच सन्मान आदर्श पत्रकारांचा, सावित्रीबाई फुले विद्यालयात पार पडला हा नयनरम्य सोहळा .
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सा . फु. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि . 13 जुलै 2024 रोजी इयत्ता 5 वी आणि ८ वी तील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मध्ये उत्तुंग यश संपादन केले असे गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच आपल्या धारदार लेखणीतून सत्य जगासमोर मांडणारे पत्रकार यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला आहे .
दुग्ध शर्करा योग म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती प्रकाशनचे संचालक कृष्णकुमार पाटील हे उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले .
यानंतर विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे सचिव डॉ. महानंद माने हे होते .प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचाही सन्मान यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला आहे . या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य अरुण तुपविहिरे,पर्यवेक्षक मनोज बावा,प्राध्यापक जितेंद्र मेटकर तसेच प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री उपस्थित होते .
बालभारती पाठ्यपुस्तक निर्मितीतून मराठी भाषेतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत असते .बालभारती ची मराठी पुस्तके सर्व माध्यमातून शाळांना उपयोगी आहेत .त्यामुळे बालभारती आज घरोघर पोहोचली असल्याचे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले .यावेळी पाटील म्हणाले या शाळेचे विद्यार्थी भाग्यवान आहेत ,ज्यांनी शिक्षणाचा पाया घालून दिला त्या सावित्रीबाई फुले विद्यालयात तुंम्ही शिक्षण घेत आहेत त्यामुळे तुमच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कारही होत आहेत .
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने,पत्रकार संजय कुलकर्णी, शिवाजी घाडगे, रियाज देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख कृष्णा गायकवाड,ज्येष्ठ पत्रकार आर आर जाधव, सचिन पवार, अशोक मंडलिक , राजेंद्र पवार ,प्रसाद मैड, आकाश येवले, देवराज मंन्तोडे, उदय धामणे सह विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका सुरेखा टेमकर,प्रास्ताविक प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी केले तर आभार प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी मानले .