कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे पाण्याचा कार्यक्षम वापर व कीडनियंत्रण या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे पाण्याचा कार्यक्षम वापर व कीडनियंत्रण या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

*कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे पाण्याचा कार्यक्षम वापर व कीडनियंत्रण या विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन*

              महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेनुसार विद्यापीठाचे तंत्रज्ञान व शिफारशींचा अवलंब शेतकर्यांच्या शेतावर व्हावा या उद्देशाने विद्यापीठातील आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागामार्फत मार्गदर्शन केले जाते. यामध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, पीक उत्पादनवाढी संदर्भातील विद्यापीठाने केलेल्या शिफारशी यांचे मार्गदर्शन केले जाते. यासाठी शेतकर्यांच्या शेतावर पीक प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. या कार्यक्रमानुसार राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील संपर्क शेतकर्यांना आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील व कृषि किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जलसिंचन व्यवस्थापन विभागातील प्रशिक्षण अधिकारी श्री. दादासाहेब धोंडे आणि कृषि किटकशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापिका डॉ. पल्लवी पाळंदे तसेच संशोधन सहयोगी श्री. विनोद पवार यांनी श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव, मातापूर, खोकर, भोकर, कारेगाव आणि माळवडगाव येथील शेतकर्यांच्या शेतावर भेटी दिल्या. 

            यावेळी प्रशिक्षण अधिकारी श्री. दादासाहेब धोंडे यांनी खरीप हंगामातील पिके व त्यांना वापरण्यात येणार्या विविध सिंचन प्रणालींची जोडणी, वापर व देखभाल याविषयी मार्गदशन केले. त्याचप्रमाणे जमिनी क्षारपड होण्यापासून टाळण्यासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याविषयी मार्गदर्शक सूचना केल्या. या भेटी दरम्यान किटकशास्त्रज्ञ डॉ. पल्लवी पाळंदे यांनी खरीपातील पिके सोयाबीन, कापूस, आले, वांगी, इत्यादी पिकांची पाहणी करून पिकावर आलेल्या रोग व किडनियंत्रणाबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच वांगी पिकात व सोयाबीन पिकात नव्यानेच आढळून आलेल्या सुत्रकृमी रोगाने ग्रस्त झालेल्या झाडांचे नमुने प्रयोगशाळेत घेवून सदर सुत्रकृमींच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शक उपाययोजना सुचविल्या.उपस्थित शेतकर्यांच्या वतीने श्री. बापूसाहेब उंडे यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. या प्रक्षेत्र भेटीसाठी कृषि सहायक श्री. शेषराव देशमुख व श्री. अदिनाथ सूर्यवंशी यांनी नियोजन केले. या प्रक्षेत्र भेटीसाठी जलसिंचन व्यवस्थापन विभागातील डॉ. देविदास खेडकर व डॉ. सुभाष घोडके यांचे सहकार्य लाभले.