*महात्मा फुले कृषी विद्यापीठात महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी.*
*महापुरुषांनी दिलेले तत्वे अंगी बाळगा व यशस्वी व्हा*
राहुरी विद्यापीठ, दि. 14 एप्रिल, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन फार संघर्षातून उभे राहिले आहे. त्यांनी शिक्षण, संविधानाबरोबरच समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे तत्व आपल्याला दिले. भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी दिलेले हे तत्वे अंगी बाळगले तर स्वतःची व देशाची प्रगती होईल. महापुरुषांच्या कार्यातून प्रेरणा घ्या व शेती संशोधनात जे काही कराल ते शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कसे पोहचेल याचा विचार करा. महापुरुषांनी दिलेले तत्वे अंगी बाळगा व यशस्वी व्हा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. नानासाहेब पवार सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. सिद्धोधन कांबळे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, कृषी तंत्रज्ञानाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, प्रक्रिया अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे म्हणाले. महात्मा फुलेंना त्यांच्या मित्राच्या लग्नाच्या वरातीतून बाहेर काढले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत वर्गाच्या बाहेर बसविले गेले. या घटनांनी त्यांना विचार करायला भाग पाडले. असे कोणाच्या आयुष्यात घडू नये याकरता त्यांनी समाज परिवर्तन घडवून आणले. देशातील सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचे दार उघडे करून दिले व समता आणि न्यायाचे संविधान देशाला दिले. त्यामुळेच लोक स्वाभिमानी आणि ज्ञानी झाले. महापुरुषांचे विचार स्वीकारून तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आयुष्यात उद्देश, अनुशासन, नियोजन, रणनीती, संघटना, नेतृत्व असणे आवश्यक आहे. डॉ आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यामागचं कारण म्हणजे बौद्ध धर्माने प्रथमच स्त्रियांना स्वातंत्र्य दिले, सर्वांना शिक्षणाची दालने खुली केली, व सर्वांसाठी एकच न्याय प्रस्थापित केला. बौद्ध धर्माने मेडिटेशन, व्हिज्वलायझेशन आणि अफरमेशन चे ज्ञान हे जगाला दिले. शांतीचा मार्ग दिला. आपल्या अज्ञानामुळे संत व महापुरुषांना आपण जाती चिटकवल्या. त्यांना या जातीतून मुक्त करा व त्यांचे विचार स्वीकारा व आपली व देशाची प्रगती साधा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी डॉ. कैलास कांबळे यांनी केले. स्वागत व पाहुण्यांची ओळख डॉ. विलास आवारी यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थि प्रथमेश निंगनुरे आणि अनिकेत सरपने यांनी तर आभार ऋषिकेश मोरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख, प्राध्यापक व पदव्युत्तर महाविद्यालय तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








