मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोणी येथे डॉ. आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
लोणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
लोणी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लोणी येथे भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.
यावेळी जनसेवा युवक मंडळ, लोणी यांच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाकडून त्यांना बुद्ध मूर्ती तसेच भारताचे संविधान भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे सर्वात पवित्र असून त्याचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्याचा उपक्रम सुरू करून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले आहे, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी सर्वस्व अर्पण करून प्रचंड ज्ञान, कायद्याचे सखोल आकलन आणि अपार कर्तृत्वाच्या जोरावर सामाजिक क्रांती घडवून आणली. त्यांनी दीन-दलित, श्रमिक आणि महिला वर्गासाठी न्याय मिळवून देत जातीयता व सामाजिक विषमता कमी करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असून “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पितो तो गर्जल्याशिवाय राहत नाही” या विचारांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
संविधान हा देशाचा सर्वात पवित्र ग्रंथ असल्याचे सांगत त्यांनी पुढे नमूद केले की, महिलांच्या अधिकारांसाठी क्रांतिकारक पाऊल उचलणारे पहिले नेते म्हणजे डॉ. आंबेडकर होत. त्यांच्या विचारांतूनच आज नारीशक्ती सक्षम होत असून समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. मुंबईतील इंदू मिल येथे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू असून ते देशातील सर्वोत्तम स्मारक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या विषयावर काही राजकीय घटकांनी केलेल्या राजकारणावरही त्यांनी टीका केली.
डॉ. आंबेडकर यांची शिकवण हीच देशाच्या प्रगतीचा महामार्ग ठरणार असल्याचे सांगत त्यांच्या विचारांना तडा जाऊ न देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माझी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी आपल्या भाषणात सांगितले की, काही लोक राज्यघटना बदलली जाणार असल्याच्या अफवा पसरवून समाजात गैरसमज निर्माण करत आहेत. नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा स्वीकार करावा, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रवरा कारखान्याचे चेअरमन, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने भीम सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.











