जमिनिचे आरोग्य सुधारण्यासाठी लोकांची चळवळ होणे गरजेचे. अधिष्ठाता डॉ. सत्ताप्पा खरबडे.

*राहुरी विद्यापीठ, दि. 9 ऑगस्ट, 2025*
माती व पाणी प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्यातील उद्योजकता विकसित करण्यासाठी करा. आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना कसा होईल ते पहा. आपण आजपर्यंत जमिनीच्या आरोग्याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केलेले आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर महाविद्यालयातील मृदाशास्त्र विभागामध्ये चार दिवसीय माती व पाण्याची चाचणीमधील विश्लेषणात्मक तंत्रे या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. याप्रसंगी मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, प्रशिक्षण कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. श्रीगणेश शेळके व डॉ. रितु ठाकरे उपस्थित होते.
यावेळी डॉ. साताप्पा खरबडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 15 शासकीय व विद्यापीठाशी संलग्नित 70 महाविद्यालये कार्यरत आहेत. या महाविद्यालयातून जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम तसेच प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण यासारखे अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे. या प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींनी माती व पाणी तपासणीसाठी चांगल्या पद्धतीचे सॉफ्टवेअर वापरावीत तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर कसा होईल ते पहावे. यामुळे माती व पाणी परीक्षण अधिक परिणामकारकपणे होऊन त्याचा फायदा शेतकरी बांधवांना होईल असे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. कांबळे म्हणाले की या प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींनी या ठिकाणी मिळालेले ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा. आपण ज्या ठिकाणी काम करता तेथे या ज्ञानाचा फायदा होईल. शेतकरी जोपर्यंत हे ज्ञान वापरत नाही तोपर्यंत हे प्रशिक्षण सफल होणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी माती आणि पाणी परीक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. जमीन आरोग्य पत्रिका चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा. अर्थातच याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ. योगेश विखे, डॉ. प्राजक्ता कदम, कोमल रोकडे, प्रवीण चव्हाण, रश्मी चाकत व विजय शिंदे या प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशिक्षणातील सहभागी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रितू ठाकरे यांनी तर आभार डॉ. श्रीगणेश शेळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील,डॉ. संजय तोडमल, डॉ. सुभाष घोडके, डॉ. क्रांती पाटील, मृदाशास्त्र विभागातील कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.








