विषमुक्त शेतीसाठी जैविक निविष्ठांचा वापर करावा -कुलगुरू डॉ.विलास खर्चे.
*राहुरी विद्यापीठ, दि. 28 ऑक्टोबर, 2026*
शेतीमध्ये पिकांचे फक्त उत्पादन घेऊन चालणार नाही तर लागवड, खते, निविष्ठा यांच्यावर खुप मोठा खर्च होतो. त्यासाठी पिकांचे लागवडीचे तंत्रज्ञान समजून घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. हरितक्रांतीमुळे धान्याच्या उत्पादनात मोठी क्रांति झाली परंतु जमिनीची सुपीकता कमी झाली. विषमुक्त अन्नाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत असून शेतकरीगटांनी आपल्या गटाद्वारे किटकनाशक अंशमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर करावा. यामुळे उत्पादन खर्चात बचत होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनाच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व गुहा, ता. राहुरी येथील संत सावतामाळी शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर सभागृहात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील, आंतरविद्याशाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील, वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, राहुरीचे तालुका कृषि अधिकारी बापूसाहेब शिंदे, भाजीपाला सुधार प्रकल्पाचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. शाळीग्राम गांगुर्डे, रोग शास्त्रज्ञ प्रा. चिमाजी बाचकर, चारापिके प्रकल्पाचे गवत संशोधन अधिकारी डॉ. विजयकुमार शिंदे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक विक्रम पाठक, उमेदचे खोमणे व एनडीडीबीचे डॉ. संतोष कवणे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की आहे ती शेती उत्कृष्ट कशी करता येईल हे महत्त्वाचे असून पाणी, जमीन यासारख्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यावेळी विद्यापीठात आयोजित करण्यात येणाऱ्या थेट पीक प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जून भेट देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. विजयकुमार पाटील यांनी पाणी व्यवस्थापन, डॉ. शाळीग्राम गांगुर्डे यांनी भाजीपाला कीड व्यवस्थापन, प्रा. चिमाजी बाचकर यांनी भाजीपाला रोग व्यवस्थापन, डॉ. विजयकुमार शिंदे यांनी चारा व्यवस्थापन, विक्रम पाठक यांनी चारा व पाणी व्यवस्थापन, खोमणे यांनी महिलांचे बचतगट तर डॉ. संतोष कवणे यांनी गायींचे सुधारित ब्रीड या विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सावतामाळी शेतकरी गटाने वर्षभर राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी विद्यापीठाने तयार केलेल्या फुले सुपर बायोमिक्स माहितीपत्रकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले. याप्रसंगी संत सावतामाळी शेतकरी गटाच्या सदस्यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ सजन यांनी तर आभार पाणी फाउंडेशनचे विश्वनाथ सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संत सावतामाळी शेतकरी गटाचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ शिंदे, शेतकरी गटाचे सर्व सदस्य तसेच कनगर येथील कणकावती सोयाबीन शेतकरी गट, दवणगाव येथील स्वामी समर्थ शेतकरी गट, क्रांतीसुर्य महिला शेतकरी गट या गटाच्या सदस्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








