कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड! मध्यप्रदेशातील दोघांसह चौघे ताब्यात; १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड! मध्यप्रदेशातील दोघांसह चौघे ताब्यात; १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

मध्यप्रदेशातील दोघांसह चौघे ताब्यात; १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात मध्यप्रदेशातील दोन आरोपींसह चोरीचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याची अंगठी, चांदीचे बिस्कीट, मोबाईल, लोखंडी पान्हा आणि बॅग असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेवासा फाट्यावर सापळा रचून आरोपीला पकडले

मातोश्री अपार्टमेंट, शिवनेरी चौक, अहिल्यानगर येथील रहिवासी विवेक मारोतराव साखरे (वय ६४) यांच्या घरातून १३ ऑक्टोबर २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(३) व ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. हा गुन्हा मध्यप्रदेशातील कपील चंपालाल चावडा याने साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो नेवासा फाटा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तेथे सापळा रचून कपील चंपालाल चावडा (वय २३, रा. पटवारी कॉलनी, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.

साथीदारासह चोरीच्या दागिन्यांची विक्री

चौकशीदरम्यान कपील चावडा याने हा गुन्हा मध्यप्रदेशातील राजा चेयनसिंग पटेल (वय २३, रा. जयमलपूरा, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण) याच्या साथीने केल्याची माहिती दिली. चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने राजा पटेल याच्याकडे असल्याचे, तर उर्वरित दागिने छत्रपती संभाजीनगर येथे विकल्याचे तपासात समोर आले.

त्यानुसार पोलिसांनी राजा चेयनसिंग पटेल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट, एक मोबाईल, लोखंडी पान्हा आणि एक बॅग असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

छत्रपती संभाजीनगरमधील दोघेही ताब्यात

चोरीचा मुद्देमाल खरेदी केल्याप्रकरणी अनिल रामनारायण तिवारी (वय ५६, रा. खाराकुवा, भगवान प्लाझा, गुजराती हायस्कूलजवळ, छत्रपती संभाजीनगर) आणि भारत नानासाहेब जोशी (वय ३२, रा. हरिओमनगर, जेठवाडा रोड, हर्सूल तलाव, छत्रपती संभाजीनगर) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपींना जप्त मुद्देमालासह कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये तसेच पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, संदिप पवार, फुरकान शेख, मनोज साखरे, अमोल कोतकर आणि महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली.