महात्मा फुले कृषी विद्यापीठात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महात्मा फुले कृषी विद्यापीठात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

*विद्यापीठांतर्गत फुले कृषि तंत्रज्ञान घरोघरी, समृध्दी येईल गावोगावी उपक्रम सुरु करणार*

*- कुलगुरु डॉ. विलास खर्चे*

              महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. विलास खर्चे म्हणाले की 26 जानेवारी, 1950 हा आपल्या देशाचा स्वर्ण दिवस असून या दिवशी आपण देशाचे संविधान स्विकारले. कृषि क्षेत्र हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषि क्षेत्राच्या प्रगतीमध्ये कृषि शास्त्रज्ञ, शेतकरी व शासन यांचा मोठा वाटा आहे. कृषि क्षेत्राच्या प्रगतीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. गतवर्षी कृषि विद्यापीठाने 7 वाण, 3 कृषि अवजारे व 59 तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्यांसाठी प्रसारीत केल्या असून 3 वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत करण्यात आले आहे. गतवर्षी विद्यापीठाला दोन स्वामित्व हक्क मिळाले असून शिक्षण व संशोधनासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर 8 सामंजस्य करार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये 4 सुवर्ण, 3 रजत आणि 3 कांस्य पदके मिळविले आहेत. काळानुसार आपण शिक्षणामध्ये बदल करुन नविन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंबलबजावणी करत आहोत. शेतकरीभिमुख संशोधनाबरोबरच नैसर्गिक शेतीला चालणा देत आहोत. विद्यार्थ्यांना कौशल्य विकास व उद्योजगतेला चालणा देण्यासाठी आपण इन्क्युबेशन सेंटर्स सुरु करत आहोत. कृषि विस्तारातसुध्दा आपण प्रभाविपणे काम करत आहोत. येत्या 17-18 फेब्रुवारीला आपण फुले कृषि महोत्सव 2026-थेट पीक प्रात्येक्षिके, शिवार फेरी आणि कृषि प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. समृध्द गावे घडविण्यासाठी आपण फुले कृषि तंत्रज्ञान घरोघरी, समृध्दी येईल गावोगावी या संकल्पनेद्वारे विद्यापीठाच्या कार्यक्षातील 10 जिल्ह्यातील 10 गावे दत्तक घेवून एकात्मिक पध्दतीने कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहोत. कमी मनुष्यबळ असतांनादेखील विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले. 

           या कार्यक्रमाला विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कुलसचिव तथा अपर जिल्हाधिकारी श्री. राजेंद्रकुमार पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, उपकुलसचिव (प्रशासन) श्री. विजय पाटील, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी लेफ्टनंट डॉ. फुलसावंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण कार्यालय, पदव्युत्तर कृषि महाविद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा शल्य चिकित्सक, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली हिले यांनी मदत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे यांनी केले.