अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा डंपर ने जोराची धडक दिल्याने पोलिसांच्या खाजगी वाहनाचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान
शेवगावच्या पोलीस पथकास वाळु तस्कराकडून चिरडन्याच्या प्रयत्न.... शेवगाव तालुक्यात वाळू तस्करांची मूजोरी वाढली....!
अवैध वाळु वाहतुक करणा-या हायवा डंपरने जोराची थडक दिल्याने पोलीसांच्या खाजगी वाहनाचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान.....!
गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाचे रस्त्यावर उभे असलेले खाजगी वाहन अवैध वाळु वाहतुक करणा-या हायवा डंपरने जोराची थडक देवून उडवण्याचा खळबळ जनक प्रकार शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव परिसरात गुरुवार ता.२२ रोजी पहाटे ५ च्या सुमारास झाला. वाहनाजवळ उभ्या असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रसंगावधान दाखवत बाजुला झाल्याने थोडक्यात बचावले. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पो. हे. काँ. बाबासाहेब भागा शेळके यांच्या फिर्यादीवरुन हायवा चालक किशोर शहादेव पवार, बाळासाहेब उर्फ बाळू शहादेव पवार, हनुमान शहादेव पवार सर्व राहणार गुळज ता. गेवराई यांच्यासह दुचाकी चालक व लोकेशन देणा-यांविरोधात वेगवेगळ्या कलमांव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल, पो.काँ. बप्पासाहेब धाकतोडे, राहुल खेडकर, चालक होमगार्ड जमीर शेख यांचे पथक खाजगी वाहनाच्या मदतीने गुरुवार ता.२२ रोजी पहाटे २ ते ५ च्या दरम्यान बीड सरहद्दीवरील सुकळी फाटा ते लाडजळगाव रस्त्यावर मुरमी गावच्या शिवारात तपासणी करत होते. *यावेळी पहाटे ५ च्या सुमारास दहा टायर हायवा क्रमांक एम.एच २३ ए.यु १९७५ हे भरधाव वेगाने आले. त्यास थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने ते न थांबवता उभ्या असलेल्या कर्मचा-यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. तर उभ्या असलेल्या गाडीस मागील बाजूस धडक देवून भरधाव वेगाने गेले. त्यानंतर त्या वाहनाचा पाठलाग करत असता चार चाकी वाहन चालकाने व अनेक ठिकाणी दुचाकीवर आलेल्या व्यक्तींनी वेळोवेळी अडथळा निर्माण करुन हायवा चालक व वाहनास पळून जाण्यास मदत केली. तसेच पाठलाग करत असतांना हायवा चालकाने रस्त्यात वाहनातील वाळू टाकून अडथळा निर्माण केला. याबाबत गुळज ता. गेवराई जि. बीड येथे शोध घेत असतांना सदरील वाहन किशोर पवार यांच्या मालकीचे असून ते अवैध वाळू तस्करीसाठी बाळू पवार, हनुमान पवार यांच्या मदतीने चालवून बोलेरो वाहन टेहळणी करण्यासाठी वापरत असल्याचे समजले.* चकलांबा ता. गेवराई पोलीसांच्या मदतीने पाहणी केली असता गुळज येथे पवार यांच्या घऱासमोर वाळू वाहतुक करणारे वाहन आढळून आले. मात्र तेथे कोणीही आढळून आले नाही. त्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्याच्या मदतीने हनुमान पवार व बाळू पवार यांना चार चाकी वाहनासह ताब्यात घेतले. या सर्व जणांविरुध्द पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.