शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम संपन्न ; माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर केल्यास शेती फायदेशीर होईल - विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे

1.

*शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम संपन्न*

*माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर केल्यास शेती फायदेशीर होईल*

*- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे*

 जमिनीचे आरोग्य हे आपल्या सर्वांशी निगडित आहे. माती, पाणी परीक्षण करूनच खत व्यवस्थापन करा व पिकांचे उत्पादन घ्या. विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करा. हवामान बदलाला अनुसरून पिकांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या तरच शेती फायदेशीर होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील अ.भा.स. माती परिक्षण व पीक प्रतिसाद प्रकल्प, मृद विज्ञान विभागाच्या वतीने शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम 2026 व मृदा आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. याप्रसंगी मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील, मृदरसायन शास्त्रज्ञ डॉ. आनंद जाधव, मृद विज्ञान विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. रितू ठाकरे, डॉ. श्रीगणेश शेळके व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय वने उपस्थित होते.

 यावेळी डॉ. भीमराव कांबळे मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की महाराष्ट्रामध्ये 179 माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून माती परीक्षण करून जमिनीचे आरोग्य जपणे ही सर्वांची भूमिका असली पाहिजे. माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होते. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म राखायला हवेत. संतुलित रासायनिक खतांबरोबरच जैविक खते, सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा लागणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. यावेळी तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. आनंद जाधव यांनी सोयाबीन, ऊस व कपाशी पिकांसाठी संतुलित खत व्यवस्थापन, डॉ. नंदकुमार भुते यांनी सोयाबीन, ऊस, कपाशी पिकातील किड व रोग व्यवस्थापन, डॉ. श्रीगणेश शेळके यांनी क्षारपड जमीन व्यवस्थापन, डॉ. शुभांगी कदम यांनी अपेक्षीत उत्पादन तंत्रानुसार सोयाबीन पीक प्रात्यक्षिक माहिती व डॉ. क्रांती पाटील यांनी सिंचन पाणी परिक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. दत्तात्रय वने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 यावेळी श्री. जनार्दन आढाव, श्री. दिलीप लिपटे, श्री. अंबादास बाचकर, श्री. रामविलास सोमानी, श्री, चौधरी, सौ.रेखा कांबळे व श्री. बालाजी कांबळे या शेतकर्यांना मान्यवरांच्या हस्ते मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, अ.भा.स. माती परिक्षण व पीक प्रतिसाद प्रकल्प प्रक्षेत्र या ठिकाणी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. आनंद जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. क्रांती पाटील यांनी तर आभार डॉ. शुभांगी कदम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मृद विज्ञान विभागातील डॉ. शीतल ताटपूरकर, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य व सोयाबीन पीक प्रात्यक्षिक घेणारे शेतकरी उपस्थित होते. या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी मृद विज्ञान विभागातील राजेंद्र शिंदे, अनिता घाडगे, संदिप बेल्हेकर यांनी परिश्रम घेतले.