भटक्या - विमुक्त प्रवर्गाच्या महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून नवी झेप घ्यावी : दिशा पिंकी शेख

भटक्या - विमुक्त प्रवर्गाच्या महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून नवी झेप घ्यावी : दिशा पिंकी शेख

 

 

भटक्या-विमुक्त महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून नवी झेप घ्यावी : दिशा पिंकी शेख

 

संगमनेर येथे ‘स्त्रीशक्ती सन्मान सोहळा’; वंचित समूहांसोबत काम करणाऱ्या ६० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

            भटके-विमुक्त स्वातंत्र्य दिन २०२६ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दल, निर्मिती संस्था, लोक प्रबोधिनी आणि छात्रभारती यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथे ‘स्त्रीशक्ती सन्मान सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संगमनेर-अकोले तालुक्यात वंचित समूहांसोबत विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या ६० कर्तृत्ववान महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

 

        ज्ञानमाता विद्यालय, संगमनेर येथे झालेल्या या कार्यक्रमात महिलांचे प्रश्न, शिक्षण, सामाजिक न्याय, शासकीय यंत्रणांची भूमिका आणि भटक्या-विमुक्त समाजातील महिलांसमोरील आव्हाने यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव डॉ. सागर भालेराव यांनी सोहळ्याची भूमिका मांडली. राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांनी कार्यक्रमामागील सामाजिक भूमिका स्पष्ट केली.

 

           यावेळी बोलताना दिशा पिंकी शेख यांनी महिलांच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करताना, “महिला या कायम भटक्याच आहेत,” असे सांगितले. वर्णव्यवस्थेने महिलांना कायम दुय्यम स्थान दिले असून महिलांचा कोंडवाडा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही, असे त्यांनी नमूद केले. भटक्या-विमुक्त समाजातील महिलांसमोर तर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आव्हानांचा मोठा पल्ला असल्याचे सांगत शिक्षणाशिवाय या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा पर्याय नाही, असे त्यांनी ठामपणे मांडले.

 

         उत्कर्षा रुपवते यांनी राज्य महिला आयोगाचे कामकाज, महिलांना उपलब्ध असलेल्या यंत्रणा आणि तक्रारींच्या निवारणासाठीच्या प्रक्रियेची माहिती उपस्थितांना दिली. तसेच शासनाने ‘लाडक्या बहिणीं’ना परकेपणाची वागणूक न देता त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.माजी शिक्षण उपसंचालक रमाकांत जाधव यांनी महिलांसाठी आणि वंचित घटकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा व योजनांची माहिती दिली. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

*अतुल पवार आणि रियाज पिंजारी यांच्या मातांचा विशेष सन्मान*

         या सोहळ्यातील सर्वांत भावनिक क्षण ठरला तो मागील वर्षी नालेसफाई करताना मृत्यू झालेल्या अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोन युवकांच्या मातांचा सन्मान.नालेसफाईसारख्या धोकादायक कामात या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मातांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान स्वीकारताना उपस्थित वातावरण भावूक झाले. युवकांच्या कुटुंबीयांच्या दुःखाशी एकरूप होत उपस्थितांनी उभे राहून त्यांच्या कुटुंबीयांना मानवंदना दिली. यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

 

         समाजातील वंचित आणि उपेक्षित समूहांसाठी प्रतिकूल परिस्थितीतही काम करणाऱ्या महिलांचा सन्मान हा केवळ पुरस्कार नसून त्यांच्या संघर्षाला आणि सामाजिक योगदानाला दिलेली मान्यता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या धैर्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने भटक्या-विमुक्त महिलांच्या शिक्षणाचा, सन्मानाचा आणि सामाजिक हक्कांचा प्रश्न पुन्हा अधोरेखित केला. स्त्रियांनी शिक्षण, संघटन आणि सामाजिक सहभागाच्या माध्यमातून आपले स्थान अधिक सक्षम करण्याची गरज या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.

 

       कार्यक्रमासाठी निर्मिती संस्था, लोक प्रबोधिनी, छात्र भारती संघटनेने विशेष मेहनत घेतली. छात्र भारतीचे अध्यक्ष अनिकेत घुले यांनी आभार मानले.