*मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.*

*मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.*

*मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*

*राहुरी विद्यापीठ, दि. 30 ऑगस्ट, 2026* 

          हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन–2026 महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध क्रीडा उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या नेतृत्वाखाली पदव्युत्तर महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

           राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करणे, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच खेळाच्या माध्यमातून संघभावना, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भव्य सायकल रॅली, फुटबॉल व बॅडमिंटन स्पर्धांसह विविध मनोरंजक खेळांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सायकल रॅलीने झाली. या सायकल रॅलीमध्ये कृषी विद्यापीठ सायकलिंग क्लब आणि राहुरी सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी सहभाग घेतला. या रॅलीमध्ये काढणीपश्चात तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम कड, विद्यापीठ नियोजन अधिकारी डॉ. नारायण मुसमाडे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ. बाबासाहेब भिंगारदे आणि राहुरी सायकलिंग क्लबचे अध्यक्ष अरुण ताकटे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

         यावेळी पदव्युत्तर महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये रंगतदार फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच विविध मनोरंजक खेळांमुळे कार्यक्रमात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमातून ‘खेळातून आरोग्य, आरोग्यातून ऊर्जा आणि ऊर्जेतून यश’ हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन करत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.