महात्मा फुले कृषी विद्यापीठात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी  जयंती मोठ्या उत्सहात साजरी.

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे समता, स्वाभिमान व ज्ञानाचा उत्सव साजरा करणे होय*

*- कुलगुरु डॉ. शरद गडाख*

*राहुरी विद्यापीठ, दि. 14 एप्रिल, 2025*

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेतांना विविध अडचणी आल्या. त्यांनी अर्धपोटी राहुन मिळविलेल्या पदव्यांवर जर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता किती महान होती. अशा या महामानवाने शेतकर्यांसाठी देखील खुप महत्वाचे असे कार्य केले आहे. यामध्ये लहान शेतकर्यांच्या अडचणी व व्यथेंवर मार्ग सुचविले. शेतजमिनींचे राष्ट्रीयकरण, सिंचन व शेतीसाठी कर्ज योजना, कृषि शिक्षणावर भर असे त्यांचे मोठे योगदान आहे. अशा या महामानवाची जयंती साजरी करणे म्हणजे समता, स्वाभिमान व ज्ञानाचा उत्सव साजरा करणे होय असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि अभियांत्रिकी महाविद्यलयातील डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहणे म्हणुन जेष्ठ साहित्यीक अॅड. अनंत खेळकर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान, मुर्तीजापूर जि. अकोला येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिवाकर गवांदे व क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते.

 यावेळी अॅड. अनंत खेळकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहिल्यानंतर आपल्या असे लक्षात येते की विद्येच्या व ज्ञानाच्या बळावर एखादी व्यक्ती देशाचे भविष्य उज्वल करु शकते. डॉ. आंबेडकरांनी उठा, शिका व ज्ञानी व्हा असा जो मंत्र सर्वांना दिला तो प्रत्येकाने गांभीर्यांने घ्येण्याची गरज आहे. त्यांना रामजी बाबांसारखे संस्कारी वडील भेटल्यामुळे बाबासाहेब घडले. त्यांची त्यांच्या आई-वडीलांवर नितांत प्रेम व श्रध्दा होती. ज्या आई-वडीलांनी कष्ट करुन आपल्याला लहानाचे मोठे केले त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही याची काळजी घ्या अशी शिकवण त्यांनी दिली. एकमेकांना मदत करा, मातृभाषेचा सन्मान करा, कुणाचीही निंदा नालस्ती करु नका, वेळ व्यर्थ वाया घालवू नका. 140 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशवासीयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे कवच दिले असून त्या संविधानाप्रती सजग रहा अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले.

 कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. महाविरसिंग चौहान यांनी करुन दिली. याप्रसंगी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेली कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या साठे हिने तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उपकुलसचिव (प्रशासन) विजय पाटील, आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, अधिकारी, कर्मचारी व पदव्युत्तर, कृषि अभियात्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.