सरोज आल्हाट यांना इंडियन पिनॅकल आर्ट आयकॉन नॅशनल अवॉर्ड 2024
अहमदनगर - (प्रतिनिधी) अहमदनगर येथील सुप्रसिद्ध कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार सरोज आल्हाट यांना इंडियन पिनॅकल आर्ट आयकॉन नॅशनल अवॉर्ड 2024 जाहीर झाला असून लवकरच पणजी गोवा येथे मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण साळवे व सुप्रिया चौधरी यांनी कळवले आहे.
ज्ञानरचना सोशल फाउंडेशन संपूर्ण देशभर महिलांचे सबलीकरण, वंचित महिला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कल्याण आदी उपक्रम राबवत आहे. सरोज आल्हाट वयाच्या दहाव्या वर्षापासून काव्यलेखन करत असून त्यांचे अश्रूंच्या पाऊलखुणा, सखे, कविता तुझ्या नी माझ्या, अनन्यता असे चार काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.अनेक इंग्रजी व मराठी मासिकांचे संपादन त्यांनी केले असून मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांमधूनही त्यांचे लेख व कविता प्रसिद्ध झाले आहेत. प्रकल्प संचालक, जनरल सेक्रेटरी अशा उच्च पदावर राहून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दलित,शोषित, पीडित, आदिवासी, बालकल्याण, परित्यकत्या,आरोग्य समस्या, युवकांचे प्रश्न, कुष्ठरुग्ण,वीटभट्टी कामगार,ऊसतोड कामगार, एड्सग्रस्त या घटकांसाठी विकासात्मक व धोरणात्मक कार्यक्रमांमध्ये त्या गेली तीस वर्षापासून काम करत आहेत. अनेक संस्थांमधून तसेच कार्यक्रमांमधून,साहित्यातून प्रबोधनपर व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. स्व. राजीव गांधी, शंकरदायाची शर्मा, मदर तेरेसा तसेच अनेक मान्यवर साहित्यिकांकडून त्यांची प्रशंसा झालेली आहे. अखिल भारतीय पातळीवरील इंग्रजी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच राज्यस्तरीय आठवले साहित्य पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, स्वानंद काव्य पुरस्कार,कविरत्न पुरस्कार, राष्ट्र मित्र पुरस्कार, जिल्हा नेहरू युवा पुरस्कार, समाज ज्योत पुरस्कार, बाबा पद्मनजी स्मृती पुरस्कार,अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला पुरस्कार आदी राज्य व देश पातळीवरील पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याची कार्याची दखल घेऊन त्यांना इंडियन पिनॅकल आर्ट आयकॉन नॅशनल अवॉर्ड देण्यात येणार आहे.असे संस्थेने म्हटले आहे.स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र, मेडल पदक,शाल, बुके असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.
सदर पुरस्काराबद्दल सरोज आल्हाट यांचे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडूळे, मसाप चे चंद्रकांत पालवे, लोकसंस्कृती विकास संशोधन व संवर्धन संस्थेचे प्रा.डॉ.मिलिंद कसबे, अशितोष (बॉबी) लोखंडे यांनी अभिनंदन केले आहे.