राहुरी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची किमया :दहा एकरांत 154 टन डाळिंब , 2.78 कोटींचे उत्पन्न

राहुरी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची किमया :दहा एकरांत 154 टन डाळिंब , 2.78 कोटींचे उत्पन्न

*राहुरी कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची किमया : 10 एकरांत 154 टन डाळिंब, 2.78 कोटींचे उत्पन्न*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील डाळिंब व पेरू उत्पादक शेतकर्यांच्या बागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी शासकीय कृषि महाविद्यालय, पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर व अखिल भारतीय कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. सुभाष गायकवाड उपस्थित होते. तसेच सदर पाहणी दरम्यान पीक लागवड खर्चाचा अंदाज (कृषि अर्थशास्त्र) या योजनेचे कृषि सहाय्यक काकड व गोसावी उपस्थित होते.

 यावेळी प्रगतशील शेतकरी बापूसाहेब दुधाळ यांच्या डाळिंब बागेची पाहणी करण्यात आली. त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून 10 एकर क्षेत्रातून 154 टन डाळिंब उत्पादन घेतल्याची माहिती दिली. यासाठी एकरी सुमारे 7 लाख रुपये खर्च करून 2.78 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मिळविलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुलगुरू डॉ. खर्चे यांनी श्री. दुधाळ यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित डाळिंब उत्पादक शेतकर्यांशी संवाद साधताना कुलगुरूंनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा शास्त्रीय पद्धतीने अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यापीठ निर्मित फुले सुपर बायोमिक्स आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन केले.

 याप्रसंगी सुनील भोग व हर्षल भोग यांच्या डाळिंब तसेच पेरू बागांची पाहणी करण्यात आली. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्यांनी साधलेली प्रगती पाहून कुलगुरूंनी समाधान व्यक्त केले. प्रगतशील कृषि पदवीधर शेतकरी तुषार खराडे यांच्या पेरू बागेसही भेट देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. खर्चे यांनी तरुण कृषि पदवीधरांनी विद्यापीठाशी सातत्याने संपर्क ठेवून तांत्रिक चर्चा करावी आणि विद्यापीठाचे आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. विद्यापीठाचे संशोधन, कृषि पदवीधर आणि शेतकरी यांच्यातील समन्वयातून आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे प्रभावी तंत्रज्ञान हस्तांतरण होऊन शेतकर्यांची उत्पादनक्षमता व आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल असा संदेश या क्षेत्रभेटीतून देण्यात आला.