चांदा शिवारात बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले ! वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर .

चांदा शिवारात बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले ! वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर .

चांदा शिवारात बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले!वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर; परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

 नेवासा तालुक्यातील चांदा-मिरी रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याची घटना शनिवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पिल्लाला विहिरीतून बाहेर काढले. या घटनेमुळे चांदा परिसरात बिबट्याच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदा-मिरी रस्त्यालगत बाबासाहेब पुरुषोत्तम राशिनकर यांच्या गट क्रमांक २८९ मधील विहिरीत शुक्रवारी (दि. २३) रात्रीच्या सुमारास बिबट्याचे पिल्लू पडले. मात्र, ते नेमके कधी आणि कशामुळे विहिरीत पडले, याची कोणालाही माहिती नव्हती.

शनिवारी सकाळी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर बाबासाहेब राशिनकर हे शेताला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार सुरू करण्याकरिता गेले होते. त्यावेळी विहिरीत किती पाणी आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी आत डोकावले असता त्यांना पाण्यात बिबट्याचे पिल्लू दिसून आले. विहिरीत साधारणतः सहा ते सात फूट पाणी असल्याचे सांगण्यात आले.विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याची बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. यानंतर वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करून विहिरीत पडलेल्या पिल्लाला बाहेर काढले.

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी चिंतेतचांदा आणि परिसरातील शिवारात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वीजपुरवठ्याच्या वेळेनुसार अनेकदा रात्री शेतात जावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचा संभाव्य वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

विहिरीत बिबट्याचे पिल्लू आढळल्याने परिसरात बिबट्याची उपस्थिती असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात बिबट्याच्या हालचालींची पाहणी करावी, नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करावे आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.