राहुरी वांबोरी घाटामध्ये आढळून आला जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह

राहुरी वांबोरी घाटामध्ये आढळून आला जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह

*राहुरी वांबोरी घाटात आढळून आला जाळून गोणीत घातलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह* 

राहुरी ता प्रती - डॉ देवेंद्र शिंदे

वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटांमध्ये 17 फेब्रुवारी रोजी, सकाळच्या दरम्यान, एका इसमाचा मृतदेह गोणीमध्ये घालून जाळलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने, मृतदेह खोल दरीमध्ये फेकून देण्यात आला असा संशय आहे. सदर मृतदेहाच्या हातावर छत्रपती व छातीवर सोनाली आणि हातच्या अंगठ्यावर केके असे नाव गोंधलेले आहे.या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं, हे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 च्या दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या डोंगरगण घाटांमध्ये एक इसम सरपण तोडत होता. त्यावेळी, त्या इसमाला गोणीमध्ये घातलेला मृतदेह या ठिकाणी दिसून आला. त्यावेळी सरपण तोडणाऱ्या इसमाला दुर्गंधी येऊ लागल्याने, त्यांनी परिसरात पाहिलं असता, खताच्या गोणीमध्ये पुरुष जातीचा मृतदेह त्याला आढळून आला. त्यानं सदर घटनेची माहिती सरपंच आणि पोलिस प्रशासनाला दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, अहिल्यानगर येथील जिल्हा पोलिस उपअधीक्षक गिरीश वमने, तसेच हवालदार सतीश खामकर, अजिनाथ पालवे आदी पोलिस पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पोलिस पथकानं मृतदेह ताब्यात घेऊन, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाहीये. तो 35 ते 40 वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते. मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं, हे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या घटनेमुळे वांबोरी आणि नगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. डोंगरगण हे ठिकाण निसर्गरम्य असल्यानं, तिथे नेहमीच वर्दळ असते. घाटांमध्ये आजपर्यंत खून, दरोडे, रस्ता लूट अशा अनेक घटना घडल्या आहेत. या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आता बसवण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते.