स्व.शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ – मुख्यमंत्री फडणवीस

स्व.शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ – मुख्यमंत्री फडणवीस

स्व.शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ – मुख्यमंत्री फडणवीस

 राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या अपूर्ण स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगत अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा दर्शविला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही पोटनिवडणूक आली नसती तर अधिक आनंद झाला असता. मात्र स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या विकासकामांची पूर्तता करण्यासाठी हीच खरी संधी आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत चाणाक्षपणा, विनोदी स्वभाव आणि लोकांना जोडून ठेवण्याची ताकद होती. निळवंडे धरण कालवा, वांबोरी चारी यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सरकार त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कटिबद्ध असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. ते पुढे म्हणाले की, नगर, नाशिक आणि मराठवाडा परिसर दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. धरणांतील पाणीसाठा वाढविणे, जलव्यवस्थापन सुधारणे यावर सरकार भर देत आहे. तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक हजार एकर जागेवर नवीन एमआयडीसी उभारण्याचा प्रस्तावही सरकारसमोर आहे. अक्षय कर्डिले यांना विकासासाठी निधीचा बेअरर चेक देऊन पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की*

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीबद्दल समाधान व्यक्त करत मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांवर भर दिला. निळवंडे कालव्यांना गती देणे, मुळा धरणातील गाळ काढणे, वांबोरी चारी टप्पा २ पूर्ण करणे आणि राहुरी एमआयडीसी उभारणे या कामांमुळे परिसरातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*त्यांनी वडिलांचा वारसा जपत विकासाची गती कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली*

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे विचार, कार्यपद्धती आणि जनतेशी असलेले नाते हे अत्यंत प्रेरणादायी होते. त्यांनी केवळ राजकारण केले नाही, तर समाजकारणातून लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचे काम केले. त्यांची हीच परंपरा आणि विचार पुढे नेण्याची जबाबदारी आता अक्षय कर्डिले यांच्यावर आहे. त्यांनी वडिलांचा वारसा जपत विकासाची गती कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त करत, जनतेनेही त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून स्व. कर्डिले यांना खरी श्रद्धांजली द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

 *विश्वास आणि जनाधार अक्षय कर्डिले नक्कीच पुढे नेतील*

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यशैलीचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, कर्डिले यांनी राजकारणात प्रामाणिकपणा, सातत्य आणि लोकांप्रती असलेली बांधिलकी जपली. त्यांच्या नेतृत्वामुळे मतदारसंघात विकासाची अनेक कामे मार्गी लागली आणि जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला. हा विश्वास आणि जनाधार अक्षय कर्डिले नक्कीच पुढे नेतील, असा विश्वास व्यक्त करत, त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

*वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार*

उमेदवार अक्षय कर्डिले यांनी भावनिक भाषण करताना सांगितले की, राजकीय कारकिर्दीची सुरुवात अशा परिस्थितीत होईल असे कधी वाटले नव्हते. मात्र वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार आहे, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. या सभेला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रम पाचपुते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार प्रसाद लाड, स्नेहलता कोल्हे, सभापती अरुण तनपुरे, ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील, अलकाताई कर्डिले, महापौर ज्योती गाडे, सुवर्णा कोतकर, नगरसेवक हर्ष तनपुरे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नामदेवराव ढोकणे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, संघटन मंत्री रवि अनासपुरे, विजय चौधरी, आरपीआयचे अध्यक्ष सुरेंद्र थोरात आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मानले

राहुरी तालुका प्रतिनिधी -  डॉ देवेंद्र शिंदे