विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला चालना देण्यासाठी तीफन स्पर्धा उपयुक्त -संशोधन संचालक डॉ.सुनील गोरंटीवार .

विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला चालना देण्यासाठी तीफन स्पर्धा उपयुक्त -संशोधन संचालक डॉ.सुनील गोरंटीवार .

*विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला चालना देण्यासाठी तिफन स्पर्धा उपयुक्त*

*- संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार*

*राहुरी विद्यापीठ, दि. 3 जून, 2023*

             

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना दिल्यास त्यामधुन चांगले चांगले आविष्कार घडत असतात. त्यातुनच उद्याचे संशोधक निर्माण होतात. या विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला वाव देवून त्यातून नवनिर्मिती होण्यासाठी तिफन स्पर्धा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. 

           महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफण-2023 या कृषि यंत्रे विकसीत करण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते. याप्रसंगी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, आंतरविद्या जलसिंचन शाखेचे विभाग प्रमख तथा कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, कार्यक्रमाचे समन्वयक महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक श्री. संजय देसाई, कृषि यंत्रे व अवजारे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड व सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्सचे अधिकारी उपस्थित होते. 

             या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून या स्पर्धेचा विषय ट्रॅक्टरचलीत किंवा स्वयंचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रे हा आहे. सदर स्पर्धेसाठी देशातील एकुण 52 अभियांत्रिकी महाविद्यालयातून 15 महाविद्यालयांच्या संघाची अंतीम फेरीमध्ये निवड झालेली आहे. यामध्ये पंजाब राज्यातील दोन संघ, तामिळनाडू व हरियानामधील प्रत्येकी एक संघ व महाराष्ट्रातून 11 संघ असे एकुण 15 संघ सहभागी झालेले आहे. आज आणि उद्या चालणार्या या स्पर्धेत या अंतिम 15 संघानी बनविलेल्या भाजीपाला पूर्नलागवड यंत्रांचे पाच वेगवेगळ्या सेक्शनमध्ये चाचण्या होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष शेतावरती देखील या यंत्रांची परिक्षा घेतली जाणार असल्याचे डॉ. सचिन नलावडे व श्री. संजय देसाई यांनी सांगितले. या अंतिम फेरीत 15 संघातील स्पर्धेसाठी एकुण 315 विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि 25 पेक्षा जास्त मार्गदर्शक सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृषि यंत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील 26 पंचांची नेमणूक करण्यात आलेली आहे.