तहसीलदार यांचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात? सखोल चौकशीची मागणी

तहसीलदार यांचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात? सखोल चौकशीची मागणी

तहसीलदार यांचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात? सखोल चौकशीची मागणी

विशेष प्रतिनिधी: प्रसाद घोगरे - ९३७०३२८९४४.

बीड जिल्ह्यातील केज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या मृत्यूने महसूल विभागासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अधिकृतरीत्या हा रस्ते अपघात असल्याचे सांगितले जात असले, तरी घटनाक्रम पाहता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

माहितीनुसार, गिड्डे यांची गाडी सेलू-अंबा टोल नाक्यावरून रात्री ८.३० वाजता गेल्याची नोंद आहे, तर अपघात सुमारे १२ वाजता झाल्याचे सांगितले जाते. या दरम्यानच्या ३ ते ४ तासांचा कालावधी संशयास्पद ठरत असून, त्या काळात ते कुठे होते आणि त्यांच्या सोबत कोण होते, याचा तपास होणे अत्यंत आवश्यक आहे.

तहसीलदार म्हणून कार्यरत असताना गिड्डे हे कर्तव्यदक्ष आणि कडक निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. महसूल विभागात अनेकदा काही शासकीय अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात तसेच राजकीय दबावाखाली काम केल्याच्या चर्चाही रंगत असतात. अशा परिस्थितीत, एखाद्या ठिकाणी त्यांनी कोणाचाही दबाव न मानता किंवा आदेश न पाळता ठाम भूमिका घेतली होती का, आणि त्यातून कोणाचे हितसंबंध दुखावले गेले होते का, याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या प्रकरणात पुढील मुद्द्यांवर सखोल चौकशीची मागणी होत आहे:
अपघात नेमका कसा झाला? ८.३० ते १२ या वेळेत गिड्डे कुठे होते? त्या काळात त्यांच्या सोबत कोण-कोण होते? त्यांचा मोबाईल, रोख रक्कम व लॅपटॉप कुठे आहेत? अपघाताच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती? त्यांच्या कामकाजाशी संबंधित कोणते वाद किंवा दबाव होते का?

यावरून एका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, “ही घटना केवळ अपघात म्हणून न पाहता सर्व बाजूंनी तपासली पाहिजे. घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीआयडी किंवा विशेष पथकाकडून करण्यात यावी,” अशी मागणी केली आहे.

राकेश गिड्डे यांच्या अचानक निधनामुळे महसूल विभागात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमागील सत्य समोर यावे, यासाठी निष्पक्ष, पारदर्शक आणि दबावमुक्त चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.