अहिल्यानगर - शिर्डी मार्गावर बसमध्ये महिला चोरट्यांची टोळी सक्रिय पोलिस प्रशासन झोपेत? ST महामंडळही जबाबदार?

अहिल्यानगर - शिर्डी मार्गावर बसमध्ये महिला चोरट्यांची टोळी सक्रिय पोलिस प्रशासन झोपेत? ST महामंडळही जबाबदार?

अहिल्यानगर - शिर्डी मार्गावर बसमध्ये महिला चोरट्यांची टोळी सक्रिय
पोलिस प्रशासन झोपेत? ST महामंडळही जबाबदार?

प्रसाद घोगरे : अहिल्यानगर प्रतिनिधी - ९३७०३२८९४४

अहिल्यानगर ते शिर्डी या गजबजलेल्या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी धोक्याची घंटा समोर आली आहे. या मार्गावर बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करत एक संघटित महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची गंभीर माहिती समोर येत आहे. ही टोळी प्रवाशांच्या नकळत दागिने, रोख रक्कम आणि पर्स चोरून क्षणार्धात पसार होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी अहिल्यानगर, राहुरी, राहुरी फॅक्ट्री, कोल्हार, बाभलेश्वर, राहाता, शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर या मार्गावरील बसमध्ये नियमितपणे प्रवास करत महिलांना लक्ष्य करते. गर्दीचा फायदा घेत ही टोळी अत्यंत चलाखीने चोरी करत असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, या टोळीत सुमारे १५ जणांचा समावेश असून त्यामध्ये ८ ते १० महिला आणि ५ पुरुष असल्याची माहिती आहे. चोरी झाल्यानंतर संबंधित पुरुष सदस्य हे “कव्हर” देण्याचे आणि सेटलमेंट करण्याचे काम करत असल्याचा आरोपही पुढे येत आहे. त्यामुळे ही टोळी अधिक संघटित पद्धतीने कार्यरत असल्याचा संशय बळावत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी श्रीरामपूर परिसरातील असल्याची चर्चा असून, यापूर्वी लोणी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते. मात्र, त्यानंतरही टोळीवर प्रभावी कारवाई झालेली दिसत नाही.

तक्रार घ्यायलाच टाळाटाळ?
सर्वात गंभीर बाब म्हणजे, अनेक वेळा चोरी झाल्यानंतर पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे आरोप आहेत. यामुळेच या टोळीला मोकळे रान मिळत असून चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत.

पोलिसांवर प्रश्नचिन्ह - नगर LCB नेमकी काय करते?
या मार्गावरून जाणारी बस ७ वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जाते. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी होत असताना चोरट्यांना भीती का वाटत नाही? स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि संबंधित पोलीस यंत्रणा नेमकी काय भूमिका बजावत आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

मोका अंतर्गत कारवाईची मागणी
सदर टोळीवर कठोर कारवाई करून महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरत आहे. कारण ही टोळी संघटित पद्धतीने, नियोजनबद्धरीत्या गुन्हे करत असल्याचा ठोस संशय आहे.

गरीब महिलांचं उद्ध्वस्त होतंय आयुष्य
या चोऱ्यांमध्ये प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्या महिलांना लक्ष्य केले जात असून, त्यांच्या कष्टाने कमवलेल्या पैशांवर डल्ला मारला जात आहे. यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली जात आहे.

प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून सखोल चौकशी करावी, संबंधित टोळीचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

ST महामंडळही जबाबदार? प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
या संपूर्ण प्रकारात राज्य परिवहन म्हणजेच ST महामंडळाची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
दररोज हजारो प्रवासी या मार्गावर प्रवास करत असताना:
बसमध्ये कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही
संशयास्पद प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था नाही
चालक-वाहकांना अशा घटनांबाबत कोणतेही प्रशिक्षण नाही
वारंवार तक्रारी येऊनही कोणतीही ठोस कारवाई नाही
प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ST महामंडळाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आता जोर धरत आहे. प्रवासी लुटले जात असताना ST प्रशासन फक्त तमाशा बघतंय का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.