शिलेगावात मातीचा डंपर भरधाव वेगात घरात घुसला; महिला गंभीर जखमी*
*शिलेगावात मातीचा डंपर भरधाव वेगात घरात घुसला; महिला गंभीर जखमी*
*राहुरी, दि. 11 मे 2026*: राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे रविवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मातीने भरलेला भरधाव डंपर थेट घरात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात घरातील महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंदळ रस्त्या

ने शिलेगावच्या दिशेने जाणारा मातीने भरलेला डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट सुभाष बबन म्हसे यांच्या घरात घुसला. डंपरने घराच्या तीन भिंती पाडून स्वयंपाकघरात प्रवेश केला. त्यावेळी स्वयंपाकघरात असलेल्या रोहिणी सचिन म्हसे या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी रोहिणी म्हसे यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शिलेगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. काल उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.








