पालकमंत्र्यांच्या आदेशाला लोणी खुर्द ग्रामसेवकाने दाखवली केराची टोपली; ग्रामस्थ संतप्त
पालकमंत्र्यांच्या आदेशाला लोणी खुर्द ग्रामसेवकाने दाखवली केराची टोपली; ग्रामस्थ संतप्त
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील नेहरूनगर परिसर आज गंभीर नागरी समस्यांच्या विळख्यात सापडला असून ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ, निष्क्रिय आणि दुर्लक्ष करणारा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी, निवेदने, पाठपुरावा तसेच प्रत्यक्ष भेटी देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेहरूनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आले असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी पुरेसा रस्ता देखील उरलेला नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे, मुरूम-खडीचे ढिगारे, माती, कचरा, गंज, चारा, गवऱ्या, बांधकाम साहित्य, वाहन पार्किंग तसेच घाण पाणी सोडण्याचे प्रकार सुरू असल्याने परिसर अक्षरशः गुदमरला आहे. काही नागरिकांनी स्वतःच्या जागेचा इंचभर भागही सार्वजनिक रस्त्यासाठी सोडण्यास नकार देत सरकारी जागांवर अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
सदर गंभीर प्रश्नाबाबत परिसरातील नागरिकांनी प्रवरानगर येथे झालेल्या जनता दरबारात थेट जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित ग्रामसेवक महेश काळे यांना नागरिकांना त्रासदायक ठरणारे अतिक्रमण तात्काळ हटवून योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जाते. मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही कारवाई न करता आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे पत्रकारांनी ग्रामसेवक महेश काळे यांना याबाबत जाब विचारला असता, “माझी कुठे तक्रार करायची करा… मी घाबरत नाही… मला तेवढंच काम नाही,” अशा उर्मट व धमकीवजा भाषेत उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या गावातच संबंधित अधिकारी पत्रकारांशी व नागरिकांशी अशा भाषेत बोलत असतील तर सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासन कितपत गांभीर्याने पाहत असेल, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की भविष्यात परिसरात आग लागणे, आरोग्य आपत्ती किंवा अन्य अनुचित घटना घडल्यास पोलीस, अँब्युलन्स किंवा अग्निशामक दलाची गाडी आत पोहोचू शकणार नाही, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तरीदेखील ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “प्रत्येकाने स्वतःच्या जागेतील थोडी जागा सार्वजनिक रस्त्यासाठी सोडली तर प्रश्न सहज सुटू शकतो.” मात्र काही लोकांच्या हटवादी भूमिकेमुळे संपूर्ण परिसराला त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. अनेक घरांचे कंपाऊंड, भिंती, गेट, पायऱ्या तसेच इतर बांधकामे सार्वजनिक रस्त्यांमध्ये आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून अनेक कुटुंबांनी आपली घरे विकून दुसरीकडे स्थलांतर केल्याची माहिती समोर येत असून अजूनही अनेक घरे विक्रीसाठी असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. नागरिकांनी आता इशारा दिला असून सार्वजनिक रस्त्यावर अडथळे निर्माण करणाऱ्या व्यक्तींची नावे व माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
नेहरूनगर परिसरातील अतिक्रमण व नागरी समस्यांबाबत वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही ग्रामसेवक महेश काळे यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा नागरिकांचा आरोप असून, भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास त्यास पूर्णतः ग्रामसेवक महेश काळे जबाबदार राहतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. तसेच संबंधित ग्रामसेवकांची तक्रार तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), गटविकास अधिकारी, ग्रामविकास विभाग तसेच पालकमंत्री यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
लवकरात लवकर कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा, उपोषण आंदोलन तसेच तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
आता नेहरूनगर परिसरातील गंभीर अतिक्रमण, नागरिकांना होणारा त्रास तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्याच्या प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), तहसीलदार, गटविकास अधिकारी (पंचायत समिती), ग्रामविकास विभाग, पोलीस प्रशासन तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संबंधित ग्रामसेवक व अतिक्रमण करणाऱ्यांवर नेमकी कोणती प्रशासकीय, कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे








