म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथे गुणवत्ता पूर्ण जैविक कीडनाशकाची निर्मीती करत तरुण उद्योजक व्हा - अधिष्ठता डॉ. प्रमोद रसाळ
*गुणवत्तापूर्ण जैविक कीडनाशकांची निर्मिती करत तरुण उद्योजक व्हा*
* -अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ*
*राहुरी विद्यापीठ, दि. 15 मार्च, 20 22*
आधुनिक शेतीची कास धरून विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी गुणवत्तापूर्ण जैविक कीडनाशकांची निर्मिती करत तरुण उद्योजक व्हा व रोजगार निर्मिती करा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयातील कृषी कीटकशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली तर्फे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी च्या (SC-SP) अनुदानाअंतर्गत जैविक कीडनाशके उत्पादन या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रमोद रसाळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील होते. याप्रसंगी बोलताना डॉ. सी. एस. पाटील म्हणाले की मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या मिशन सेंद्रिय शेती या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी युवा पिढीने जैविक कीडनाशकांची उच्च गुणवत्ता राखत उत्पादन केले पाहिजे व विविध जैविक घटकांच्या मदतीने पिकांवरील किडींचे नियंत्रण करून पर्यावरणाचा समतोल राखावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील, वनस्पती रोगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, कृषी कीटकशास्त्र माजी विभागप्रमुख डॉ. जे. आर. कदम, अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. वसंत पोखरकर, डॉ. सी.एस. चौधरी, कृषी कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. डी. पाटील, डॉ. पल्लवी पाळंदे, डॉ. एस.टी. आघाव, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. ए. आर. हजारे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दिले. या प्रशिक्षणात 25 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, कृषिदर्शनी व जैविक कीडनाशक यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी पाळंदे यांनी तर आभार कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संतोष कुलकर्णी यांनी मानले. सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. ए. आर. हजारे, डॉ. पल्लवी पाळंदे, प्रा. आर. एस. भोगे, श्रीमती बारंगे, श्रीमती चेमटे, श्रीमती नांगरे व श्री गणेश घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.