महाराष्ट्र -अहमदनगर - राहुरी कृषी विद्यापीठातील कास्ट प्रकल्पास विविध राज्यातून भेटी -
*राहुरी कृषी विद्यापीठातील कास्ट प्रकल्पास विविध राज्यातून भेटी*
*राहुरी विद्यापीठ, दि. 18 मार्च, 2022*
जागतिक बँक अर्थसहाय्यित, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित केलेले विविध डिजिटल व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान पाहण्यासाठी नेहमीच देशभरातून शास्त्रज्ञ व विद्यार्थी या ठिकाणी भेट देत असतात. हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वाटर संस्थेचे केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र येथील कर्मचारी, विद्यार्थी आणि संशोधक यांनी नुकतीच कास्ट प्रकल्पास भेट दिली. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषीविद्या शाखेचे निवृत्त प्राध्यापक डॉ. आनंदा वाणी, वॉटर संस्थेचे वरिष्ठ संशोधक डॉ. अरुण भगत तसेच कास्ट प्रकल्पाचे सर्व संशोधन सहयोगी या वेळी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान कास्ट प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ड्रोन व रोबोटिक्स प्रयोगशाळा याबद्दल डॉ. गिरीशकुमार भणगे यांनी संबंधितांना माहिती दिली. विविध हवामान अद्ययावत केंद्र व बाष्पीभवन मापक याबद्दल सविस्तर माहिती डॉ. वैभव मालुंजकर यांनी दिली. डॉ. प्रज्ञा जाधव यांनी ऑटो पीआयएस, स्मार्ट पीआयएस, स्वयंचलित पंप प्रणाली आणि सेन्सर आधारित सिंचन प्रणाली याबद्दल सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान कास्ट प्रकल्पातील सदस्य, संशोधन सहयोगी व इतर कर्मचारी यांनी चर्चा करून भेट देणाऱ्या संशोधक व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. डॉ. शुभांगी घाडगे यांनी या भेटीचे संपूर्ण नियोजन व आयोजन केले तसेच सर्वांचे आभार मानले.