आदिवासी उपयोजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर राबविणार हरभरा पिकाची आद्यरेखा प्रात्यक्षिके .

आदिवासी उपयोजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर राबविणार हरभरा पिकाची आद्यरेखा प्रात्यक्षिके .

*आदिवासी उपयोजनेअंतर्गत शेतकर्यांच्या शेतावर राबविणार हरभरा पिकाची आद्यरेखा प्रात्यक्षिके*

*राहुरी विद्यापीठ, दि. 9 नोव्हेंबर, 2023*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्पाच्या वतीने निंबोणी, सोनपाडा व पालीपाडा, ता. नवापुर, जि. नंदुरबार येथील 25 अदिवासी शेतकर्यांच्या शेतावर आदिवासी उपयोजना अंतर्गत हरभरा या पिकाची आद्यरेखा प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. यासाठी विद्यापीठाच्या वतीने शेतकर्यांना हरभर्याचे फुले विक्रम या सुधारीत वाणाचे बियाणे, ट्रायकोडर्मा, रायझोबीयम व सुक्ष्म अन्नद्रव्य या निविष्ठांचे वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कडधान्य सुधार प्रकल्पाचे रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे विषय विशेषज्ञ श्री. पी.सी. कुंदे, विषय विशेषज्ञ श्री. उमेश पाटील, अनिता कपूर व कृषि सहाय्यक श्री. शिवाजी गाडे उपस्थित होते. यावेळी डॉ. विश्वास चव्हाण मार्गदर्शन करतांना म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या हरभर्याच्या सुधारीत वाणांची निवड, सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब, बिजप्रक्रिया, लागवडीच्या वेळी एकरी 100 ग्रॅम ज्वारीची लागवड, एकरी 4 कामगंध सापळे, 20 पक्षीथांबे, पिकाच्या कळी अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी, पीक फुलोरा अवस्थेत असतांना हेलिओकिलची फवारणी, किडींनी आर्थिक पातळी ओलांडल्यास इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के प्रवाही 0.7 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के दाणेदार 0.4 ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 0.3 मिली/लिटर पाणी या प्रमाणे फवारणी आणि बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी जमिनीतून एकरी 2.5 किलो ट्रायकोडर्माचा वापर आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रति लिटर पाण्यातून आळवणी केल्यास हरभर्याचे एकरी 14 क्विंटल उत्पादन घेणे सहज शक्य आहे. या कार्यकमाचे प्रास्ताविक श्री. पी.सी. कुंदे यांनी तर आभार श्री. शिवाजी गाडे यांनी मानले. या कार्यक्रमाला आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.