महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीमध्ये सामंजस्य करार .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीमध्ये सामंजस्य करार*
*राहुरी विद्यापीठ, दि. 21 नोव्हेंबर, 2023*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि क्रॉम्पटन ग्रीव्हज कॉन्झुमर इलेक्ट्रीकल प्रा.लि., मुंबई यांच्यामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत आधुनिक सिंचन पध्दतीसाठी पंपाची निवड, पंपाची देखभाल व वापर तसेच यावर आधारीत विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठीची प्रशिक्षणे यांचा समावेश आहे. सदर प्रशिक्षणे व प्रात्यक्षिके ही आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग यांचे प्रक्षेत्रावर उभारलेल्या सिंचन उद्यान येथे घेण्यात येतील. यासाठी विविध प्रकारचे पंप कंपनी मोफत देणार आहे. याप्रसंगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि कंपनीचे उपमहाव्यवस्थापक श्री. प्रशांत मुदलवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, आंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. पाटील यावेळी म्हणाले की पिकांच्या सिंचनासाठी लागणारे पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्यासाठी लागणारा पंप याला अधिक महत्व आहे. पुढील काळातील युध्द हे पाण्यासाठी होण्याचे भाकीत असून पाणी हा अत्यंत मौलिक घटक आहे. विद्यापीठाने स्थापन केलेले सिंचन उद्यान हा विद्यार्थी व भेट देणार्या शेतकर्यांना मार्गदर्शक आहे. त्याठिकाणचे सिंचन व्यवस्था प्रात्यक्षिके तसेच खत व्यवस्थापन संशोधनाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने सामंजस्य कराराला महत्व आहे. श्री. मुदलवाडकर यांनी कंपनीचे योगदान विषद केले व महात्मा फुले कृषि विद्यापीठाबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. रणपिसे यांनी हा सामंजस्य करार विद्यार्थी व संशोधकांना प्रशिक्षणासाठी चांगली संधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. डॉ. महानंद माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. माने आणि श्री. मुदलवाडकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या. शेवटी डॉ. देविदास खेडकर यांनी आभार मानले.