*डॉ. मिलिंद अहिरे यांची इंडियन रीसर्च जर्नल ऑफ एक्सटेंशन एजुकेशनच्या संपादकीय मंडळावर निवड*
*राहुरी विद्यापीठ दि. 6 एप्रिल, 2022*
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयातील कृषि विस्तार व संज्ञापन विभाग प्रमुख आणि हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांची आग्रा येथील विस्तार शिक्षण सोसायटीचे इंडियन रीसर्च जर्नल ऑफ एक्सटेंशन एजुकेशनच्या संपादकीय मंडळावर पुढील तीन वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे. या नवीन नेमणुकी मुळे डॉ. आहिरे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
डॉ. अहिरे हे कृषि विस्तार व संज्ञापन विभाग प्रमुख असून त्यांच्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगावचा सहयोगी अधिष्ठाताचा अतिरीक्त पदभार आहे. डॉ. अहिरे यांनी या अगोदर धुळे कृषि महाविद्यालयाचा सहयोगी अधिष्ठाताचा पदभार सक्षमपणे सांभळला आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांनी 2005 साली जी.बी. पंत कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठातुन कृषि विस्तार या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. कृषि विद्यापीठात त्यांना विविध पदांचा 27 वर्षाचा अनुभव असुन ते विद्यापीठाचा महत्वाचा आणि मानाचा समजला जाणारा भाकृअप समन्वय अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार आणि विद्यापीठाच्या नियोजन, मुल्यमापन आणि देखरेख प्रकल्पाचे प्रमुख म्हणुन सक्षमपणे काम पाहिले आहे. महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एजुकेशनच्या सहसचिवपदी त्यांची नेमणुक असुन सोसायटी ऑफ कृषि विज्ञानच्या पश्चिम विभागाचे समन्वयक म्हणुन ते काम बघत आहे. धुळे येथील कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणुन त्यांनी चार वर्ष शेतकरीभिमुख विस्तार कार्य केले आहे. त्यांनी आतांपर्यंत 14 एम.एस्सी. (अॅग्री) आणि 6 पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कृषि विद्यापीठाचे प्रसारण केंद्र प्रमुख असताना त्यांनी विविध विद्यापीठ प्रकाशनांचे संपादन केले आहे. यामध्ये कृषिदर्शनी, श्रीसुगी, कृषिवार्ता असे अनेक प्रकाशनांचे संपादन त्यांनी केले आहे. कृषि विद्यापीठाच्या तसेच राज्यस्तरीय विविध समित्यांवर त्यांची तज्ञ सल्लागार आणि सदस्य म्हणुन नेमणूक आहे. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यामध्ये मानाचे समजले जाणारे डॉ. जी.एस. विद्यार्थी मेमोरीयल पुरस्कार आणि युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे आतांपर्यंत 100 शास्त्रीय लेख विविध शास्त्रीय नियतकालीकांमध्ये प्रसिद्ध झाले असुन विविध पुस्तकांचे त्यांनी संपादन केलेले आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांचे शेतकर्यांसाठी 60 हून अधिक कृषि विषयक लेख वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे कृषि विस्तार आणि सज्ञापनामध्ये अनुभव बघता त्यांना इंडियन रीसर्च जर्नल ऑफ एक्सटेंशन एजुकेशनच्या संपादकीय मंडळावर नेमणुक करण्यात आली आहे.