*नारायण माळींना गुन्हेगार बनविण्याचे कारस्थान थांबवा,राहुरी तालुक्यातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांची प्रशासनाकडे मागणी.*
राहुरी : राहुरी तालुक्यातील नारायण माळी यांना त्यांच्यावरील दोषसिद्ध झाले नसतांना हद्दपारीचे नोटीस काढून त्यांना सराईत गुन्हेगार बनवण्याचा चालवलेले कारस्थान थांबवा, अशी मागणी पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
राहुरी तालुक्यातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसिलदार संध्या दळवी यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तायक्वांदो, ज्युडो, कराटे खेळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, राष्ट्रीय मानवाधिकार तसेच अनुसूचित जनजाती आयोगाचे सदस्य असलेले आणि जिल्ह्यातील आणि राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती नारायण भरत माळी यांना हद्दपारीचे नोटीस काढून त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न करून बदनाम करण्यात आले आहे.

नारायण माळी हे राहुरी तालुक्याचा सन्मान आहेत. राहुरीचे नाव त्यांनी जगभर पोहचवले आहे. अनेक ठिकाणी त्यांनी कोणतेही मानधन न घेता प्रशिक्षणाचे काम केले आहे. अनेक मुलींना त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. त्यांच्या अनुभवाचा उपयोग प्रशासनाने विविध ठिकाणी करून घेतला आहे. ते एक निष्पृह, निष्कलंक, सामाजिक काम व विचार करणारे कार्यकर्ते आहेत. शहरातील रहिवासी असलेले माळी हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात. त्यांच्या कारकीर्दीबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना इत्यंभूत माहिती असून मनात प्रचंड आदरभाव आहे. ते सध्या स्पोर्ट अकादमी उभारून तालुक्यातील नव्या खेळाडूंना संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दि. २९ ऑगस्ट रोजी नारायण माळी यांना हद्दपार करण्याची नोटीस काढण्यात आली. त्यांच्यावरील आरोप हे अद्याप दोष सिद्ध झालेले नसतांना त्यांना नोटीस काढण्यात आली. सदरील नोटीसीमुळे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा राहुरी तालुक्यातील पोलीस यंत्रणेवर अविश्वास वाढत चालला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, डॉ. जालिंदर घिगे, संजय संसारे, शिरीष गायकवाड, बाबा साठे, नारायण माळी, चंद्रकांत जाधव, सागर दोंदे, संदीप कोकाटे, मधुकर विधाटे, सूर्यकांत वाकचौरे, विकास बोरुडे, अमजद पठाण, चंद्रकांत जगधने, भाऊसाहेब मनतोडे, राजू ठाकर, दत्ता जोगदंड, अनिल बर्डे, सुभाष जाधव, दीपक बर्डे, सुभाष पोटे यासह आदी उपस्थित होते.








