*महात्मा फुले कृषी विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा.*

*महात्मा फुले कृषी विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा.*

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा*

*राहुरी विद्यापीठ, दि. 26 नोव्हेंबर, 2025*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील, एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे, प्रभारी कुलसचिव श्री. व्ही.टी. पाटील व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत भारतीय राज्यघटनेच्या संविधान प्रतीची मिरवणूक काढण्यात आली. या संविधान रॅलीमध्ये पदव्युतर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व 300 पेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

 या रॅलीमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाबद्दलच्या घोषणेतून संविधानाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला. यानंतर मुख्य प्रशासकीय इमारती समोर झालेल्या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के मार्गदर्शन करताना म्हणाले की भारताचे संविधान हे खूप संशोधनाअंती तयार झाले आहे. त्यामध्ये संपूर्ण भारतीयांचे जीवनमान नियमितपणे चालण्यासाठी हक्क व अधिकार यांचा समावेश करण्यात आला आहे. मी आपणाला आवाहन करतो की सर्वांनी आपल्या जीवनात काही अंशीका होईना कायद्याचा अभ्यास करावा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान समजून घ्यावे. डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की भारतीय संविधान हे देशातील तमाम जनतेसाठी तयार करण्यात आले असून ते जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे सर्वांनी मानले आहे. आपला देश विविध जाती, धर्म व पंथांनी तयार झालेला आहे. विविध भाषांचे प्रांत तयार झालेले असले तरीही एक राष्ट्र म्हणून भारत अखंड उभा आहे. आशिया खंडातील विविध देशांमध्ये चाललेली आंदोलने व अस्थिर झालेले वातावरण पाहता देशाचे संविधान किती महत्त्वाचे आहे हे समजते. सर्वांना या संविधान दिनानिमित्त आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या घरात संविधानाची एक प्रत जतन करावी. यावेळी डॉ. कैलास कांबळे यांनी संविधान दिनाची पार्श्वभूमी सांगून उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शपथ दिली. आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.