अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला : आरोपीचे रेखाचित्र समोर

अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला : आरोपीचे रेखाचित्र समोर

अहिल्यानगर_प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४:

अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला : आरोपीचे रेखाचित्र समोर

संगमनेर (दि. १९ मार्च २०२६) – वडगावपान परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ला प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र जाहीर केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दि. १७ मार्च २०२६ रोजी वडगावपान येथील एका अल्पवयीन मुलीवर हाडकीचा ओढा मार्गे महादेव मळ्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर अज्ञात इसमाने हल्ला केला होता. अंदाजे ३२ ते ३५ वयोगटातील आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला थांबवून त्याच्याकडील बाटलीतील अॅसिडसदृश्य द्रव तिच्या चेहऱ्यावर, विशेषतः उजव्या बाजूस फेकले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली.
या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ नोंदवण्यात आला असून बी.एन.एस. कलम १२४(१) व १२६(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपास वेगाने सुरू असून गुन्हे शोध पथक अहिल्यानगर, फॉरेन्सिक युनिट संगमनेर, तसेच संगमनेर शहर व तालुका पोलीस यांच्या स्वतंत्र पथकांमार्फत आरोपीचा शोध घेतला जात आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली जात आहेत.

दरम्यान, जखमी मुलीवर प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथे उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जनरल फिजिशियन, प्लास्टिक सर्जन आणि नेत्रतज्ज्ञांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.

तपासादरम्यान मिळालेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून ते प्रसिद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या रेखाचित्रातील इसमाबाबत कोणाकडेही खात्रीशीर माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.