*महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटी.*
*राहुरी विद्यापीठ, सोमवार, दि. 22 डिसेंबर, 2025*
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदविज्ञान विभागांतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना झालेली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रेरणेने व मृदविज्ञान विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या बेलापूर, पढेगाव व कान्हेगाव तसेच राहुरी तालुक्यातील मानोरी या गावातील विविध शेतकऱ्यांशी संपर्क व त्यांच्याशी शास्त्रीय दृष्टीने विचारमंथन करण्याकरिता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. मृदविज्ञान विभागाद्वारे स्थापन झालेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाद्वारे प्रामुख्याने माती परीक्षण जागरूकता त्या अंतर्गत विद्यापीठातील विविध प्रकाशने, माती परीक्षण व पीक प्रतिसादानुसार समीकरण शिफारशी या सर्व बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात.

यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये मृदरसायन शास्त्रज्ञ तथा अंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या शेतकऱ्यांना माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. विजयकुमार पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की माती परीक्षण केल्यास शेतकऱ्यांचा रासायनिक खतावरील खर्च कमी होतो. आवश्यक तेवढेच खत देता येते त्यामुळे जमीनही खराब होत नाही. त्याचबरोबर पाणी परीक्षणाचेसुद्धा महत्त्व असून शेतकरी बांधवांनी पाणी परीक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी सहाय्यक प्राध्यापक डॉ. क्रांती पाटील, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. शुभांगी कदम व त्यांचे सहकारी उपस्थित होते.








