*व्यवसाय म्हणून शेळी पालन केल्यास शाश्वत उत्पादन शक्य -विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 30 जुलै, 2026*
शेतकर्यांना विद्यापीठामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला शेळी पालन व्यवसाय किफायतशिररीत्या करून जास्तीत जास्त नफा मिळवावा. शेळीपालन हा शेतकर्यांसाठी शाश्वत असा व्यवसाय होऊ शकतो. व्यवसाय म्हणून शेळी पालन केल्यास त्यापासून शास्वत उत्पादन शक्य असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत असलेल्या शेळी सुधार प्रकल्पांतर्गत शेळीपालनावरील तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. दिनकर कांबळे बोलत होते. शेळी पालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, व्यवसायिक शेळी पालनाबाबत तसेच नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सजगता निर्माण व्हावी या हेतूने महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शेळीपालनावरील प्रशिक्षणे आयोजित करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून सदरच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशिक्षण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे, डॉ. दिलीप देवकर, डॉ. समीर ढगे, डॉ. उल्हास गायकवाड व डॉ. अमर लोखंडे उपस्थित होते.
या तीन दिवसीय शाश्वत शेळीपालन प्रशिक्षणामध्ये तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. विष्णू नरवडे, डॉ. दिलीप देवकर, डॉ. समीर ढगे, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. उल्हास गायकवाड, डॉ. सुनील अडांगळे, डॉ. महेंद्र मोटे, डॉ. संदीप लांडगे, डॉ. प्रमोद साखरे, डॉ. रवींद्रनाथ निमसे व डॉ. अमर लोखंडे या शास्त्रज्ञांनी शास्त्रोक्त पद्धतीने पैदास, आहार व आरोग्य व्यवस्थापन, पशुधनासाठी चारा व्यवस्थापन तसेच शेळीच्या दुधाचे गुणधर्म व मूल्यवर्धन यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये वांबोरी येथील किसान मित्र फाउंडेशनचे श्री. दिगंबर अडसुरे व श्री. अविनाश क्षीरसागर यांनी शासनाच्या शेळीपालनासाठी असलेल्या विविध योजना व प्रकल्प आराखडा तयार करण्यासंबंधी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पुस्तिका व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विष्णू नरवडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. उल्हास गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. संदीप पवार, श्री. रमेश कलापुरे, श्री. ज्ञानेश्वर डांगे, श्री. गौरव घोलप, श्री. अजय गुलदगड या प्रकल्पाच्या कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षणासाठी वांबोरी येथील किसान मित्र फाउंडेशन या संस्थेच्या एकूण 44 प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला.








