कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना श्रद्धांजली निमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठात शोकसभेचे आयोजन .
*कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना श्रद्धांजलीनिमित्त महात्मा फुले कृषि विद्यापीठात शोकसभेचे आयोजन*
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या श्रद्धांजलीनिमित्त विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कुलसचिव डॉ. नितीन दानवले व कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके उपस्थित होते.
यावेळी सुरुवातीला डॉ. नितीन दानवले यांनी मा. राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन व कृषिमंत्री मा. ना. अॅड. माणिकराव कोकाटे यांनी पाठविलेल्या शोकसंदेशाचे वाचन केले. यावेळी प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे यांनी स्वर्गीय कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा जन्मापासून ते आत्तापर्यंतचा कार्यकाळ सर्वांसमोर मांडला. यावेळी बोलतांना ते म्हणाले डॉ. पी.जी. पाटील यांनी या विद्यापीठाला नविन उंचीवर नेवून ठेवले आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे व पारदर्शक कारभारामुळे विद्यापीठाचा नावलौकीक झाला आहे. डॉ. विठ्ठल शिर्के श्रध्दांजली वाहतांना म्हणाले डॉ. पी.जी. पाटील हे उत्कृष्ठ प्रशासक होते, प्रचंड अभ्यास असल्याने ते निर्णयावर ठाम असायचे. त्यांच्या गतीशील कृतीशिलतेमुळे विद्यापीठाचा नावलौकीक झाला. त्यांनी अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची कल्याण करण्याची संधी कधीच सोडली नाही. डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात म्हणाले डॉ. पी.जी. पाटील हे थोर शास्त्रज्ञ होते. त्यांच्या कुलगुरु पदाच्या कार्यकाळात त्यांनी कर्मचारी, विद्यार्थी व शेतकरी यांचे हितच जोपासले. ते एक कर्तव्यदक्ष आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. डॉ. प्रशांत बोडके, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजु अमोलिक, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, कृषि कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, डॉ. आनंद चवई, उपकुलसचिव (प्रशासन) श्री. विजय पाटील, प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. सुरसिंग पवार, श्री. बुवासाहेब म्हस्के आणि विद्यार्थी यांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली. या सर्वांनी आपल्या मनोगतात डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी विद्यापीठातील त्यांनी दिलेल्या योगदानाची तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांच्या हिताचे निर्णय यासंबंधीची माहिती तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाला मिळालेले मानांकन, विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यासाठी त्यांनी केलेले महत्त्वाचे कार्य, त्यांच्या विविध गुणांची उजळणी करून त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले. यावेळी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.