*फुले समृद्ध गाव तांभेरे येथे आनुसुचित जाती उपाययोजने अंतर्गत शेळीपालकांना खनिज मिस्रन व जंतनाशक औषधांचे वाटप.*
*फुले समृद्ध गाव तांभेरे येथे अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत शेळीपालकांना खनिज मिश्रण व जंतनाशक औषधांचे वाटप*
*राहुरी विद्यापीठ, दि.28 नोव्हेंबर, 2026*
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गत अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्प (संगमनेरी क्षेत्रीय योजना) यांच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत (SC-SP) फुले समृद्ध गाव तांभेरे, ता. राहुरी येथे शेळीपालकांसाठी मार्गदर्शन व निविष्ठा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शेळीपालन व्यवसायाचे आर्थिक व सामाजिक महत्त्व विशद केले. शेळीपालन हा ग्रामीण कुटुंबांसाठी एटीएमप्रमाणे वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे. गरजेच्या वेळी शेळ्यांची विक्री करून तातडीने आर्थिक गरजा भागविता येतात. या व्यवसायातून ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतात. विशेषतः महिलांनी शेळीपालन व्यवसायाकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील अडांगळे यांनी प्रास्ताविक करून संगमनेरी शेळी ही महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण स्थानिक जात असून तिचे जतन व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संगमनेरी शेळीची वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने प्रजनन व व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रकल्पामार्फत शेळीपालकांना संगमनेरी जातीचे नर बोकड उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याद्वारे स्थानिक शेळ्यांची आनुवंशिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून डॉ. अडांगळे यांनी शेळीपालकांना शेळ्यांचे व्यवस्थापन, उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन व पशुआहार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान श्रीमती कीर्ती गागरे यांच्या शेळीपालन प्रकल्पास भेट देण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष शेळ्यांची पाहणी करून त्यांच्या संगोपन व व्यवस्थापन पद्धतींची माहिती घेण्यात आली. शेळीपालनातील खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन व दुष्काळी परिस्थितीत चारा नियोजन याबाबत डॉ. सुनील अडांगळे यांनी मार्गदर्शन केले. उपलब्ध चारा व स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून शेळीपालन अधिक किफायतशीर कसे करता येईल याविषयी चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत उपस्थित शेळीपालकांना खनिज मिश्रण व जंतनाशक औषधांचे वाटप करण्यात आले. या निविष्ठांचा योग्य वापर करून शेळ्यांचे आरोग्य व उत्पादनक्षमता सुधारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय शेडगे यांनी केले तर श्री.संदीप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय गुलदगड, किरण मगर, रोहित कोऱ्हाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.








