*उपलब्ध मृद व जल संसाधनांचे नाविन्यपूर्ण नियोजन करणे गरजेचे* *- पद्मश्री श्री. पोपटराव पवार*
*राहुरी विद्यापीठ, दि. 22 एप्रिल, 2022*
माती व पाणी यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खाली जात आहे. ज्याच्याकडे शेततळे आहे तो शेतकरी शेततळे भरुन घेतो, ज्याच्याकडे शेततळे नाही त्याची अवस्था वाईट आहे. यामुळे शेततळे असणारे व शेततळे नसणारे अशी एक विषमतायुक्त दरी समाजात निर्माण होवू पहात आहे. या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्र विकास संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र भविष्यात देशाला दिशा देणारा प्रकल्प ठरेल. वातावरणातील बदलाचा सामना यशस्वीपणे करण्यासाठी तसेच कार्बन स्थिरीकरण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असून पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या मृद व जल या संसाधनांचे नाविन्यपूर्ण नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री श्री. पोपटराव पवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील 953 हेक्टरवरील पाणलोट क्षेत्र प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामाबद्दल पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी पाणलोट क्षेत्र विकास संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे व अहमदनगर येथील निसर्ग ज्ञान विज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष श्री. कापसे उपस्थित होते.
पद्मश्री श्री. पोपटराव पवार पुढे म्हणाले की हिवरेबाजार प्रमाणेच राहुरी कृषि विद्यापीठातही पाणलोट क्षेत्र विकासाचे काम होत आहे. देशाच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षात माती व पाणी या दोन महत्वाच्या विषयात आपण कमी पडलो आहोत. आजचा माणूस स्वार्थी झाला असून त्याची ओरबाडण्याची वृत्ती वाढली आहे. आनंद मिळेल इतकाच पैसा मिळवायला हवा असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की श्री. पोपटराव पवार यांच्या दूरदुष्टीमुळेच विद्यापीठामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे काम होत आहे. कोणतेही मोठे कार्य करायचे असेल तर त्यासाठी अनंत अडचणींवर मात करुन निरंतर प्रयत्न करावे लागतात. हा प्रकल्प निश्चितच सर्वांना दिशा देणारा ठरेल. यावेळी डॉ. शरद गडाख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. दिलीप पवार यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. डॉ. सचिन नांदगुडे यांनी प्रकल्पाच्या आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आढावा सादर केला. या भेटी प्रसंगी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. तानाजी नरुटे, डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. संजय मंडकमाले, डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बारई यांनी तर आभार डॉ. अतुल अत्रे यांनी मानले. यावेळी मृद व जलसंवर्धन शाखेचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते