नगर अर्बन को-ऑपरेटिव बँक शाखा शेवगाव सोनेतारण घोटाळ्यातील उर्वरित आरोपीस औरंगाबाद हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीन मंजूर
शेवगाव शाखा सोनेतारण घोटाळ्यातील गुन्ह्यात उर्वरित आरोपीस औरंगाबाद खंडपीठांमध्ये अटकपूर्व जामीन मंजूर .
घोटाळ्यातील मुख्य आरोपी अटकेत असलेला गोल्ड व्हॅल्यूअर विशाल दहिवाळकर कोना कोणाची नांवे घेतो किंवा घेतली असतील ते महत्वपूर्ण राहणार आहे. माननीय न्यायालयाचा निकाल बरोबर आहे. पडद्यामागचे सूत्रधार उघडे होणारच आहेत - राजेंद्र गांधी.
शेवगाव प्रतिनिधी :-यशवंत पाटेकर
येथील अनिल वासुमल आहूजा ब्रांच मॅनेजर नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा शेवगाव यांनी ३१/०७/२०२१ रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथे लेखी फिर्याद दिली होती की, ते दि. ०१/०६/२०२१ पासून बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच बँकेमार्फत सभासदांना पोटनियमानुसार व्यवसायासाठी व विविध कारणासाठी कर्ज पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज देण्यासाठी व दाखल्यानुसार व पावती नुसार सोन्याच्या मूल्यांकनाचे ७५ टक्के, बॅक संबंधित कर्जदारांना कर्ज अदा करते, त्यानुसार शेवगाव शाखेतही सोनेतारण ठेवण्याचा व त्यावर आगाऊ कर्जाऊ रक्कम देण्याचे व्यवसाय केला जातो.
बँकेच्या शेवगाव शाखेसाठी श्री विशाल गणेश दहिवाळकर यांची गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून त्यांच्या अर्जानुसार बँकेच्या पॅनलवर अधिकृत गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. बँकेच्या शेवगाव शाखेमधील कर्जदार नामे राजपूत करणसिंग शिवसिंग यांना ९ लाख ७८ हजार रुपये व तसेच काकडे साहेबराव किसन राहणार खरडगाव तालुका शेवगाव यांना १ लाख ४० हजार रुपये सोनेतारण कर्ज मंजूर केले होते. परंतु अर्जदारासारखेच इतर १५९ कर्जदारांनी ३६४ सोनेतारण कर्ज गोल्ड व्हॅल्यूवर यांच्याकडे तपासणीसाठी दिले होते. परंतु त्याचा नंतर सदरील सोने तपासणी दरम्यान, पिशव्या मधील दागिने हे खोटे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शेवगाव पोलीस स्टेशन येथे भा. द. वि. कलम ३४,४०९, ४२०, ४६५,४६८, ४७०, ४७१ प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४०७/२०२१ हा एकूण १५९ आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आला होता. अर्जदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी माननीय सत्र न्यायालय अहमदनगर येथे अटकपूर्व जामीन अर्ज मिळवण्या करता अर्ज केला होता, परंतु माननीय सत्र न्यायालय अहमदनगर यांनी आरोपींचा जामीन अर्ज रिजेक्ट केल्याने आरोपींनी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्याकरता ॲडव्होकेट एन. बी. नरवडे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील अर्जाच्या सुनावणी दरम्यान युक्तीवादामध्ये अर्जदारांचीच फसवणूक झालेली असून अर्जदारांच्या नावावर खोटी सोनेतारण दाखवून रक्कम दिल्याचे चुकीचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील अर्जदार करणसिंग राजपूत हे व्यवसायाने शिक्षक असून ते २०१३ पासून ऑक्सफर्ड मराठी प्रायमरी शाळा, नारेगाव, औरंगाबाद या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरीत आहेत. त्याचप्रमाणे अर्जदार नंबर दोन साहेबराव किसन काकडे हे शंभर टक्के अंध असूनही त्यांच्या नावाने सोनेतारण कर्ज वितरित झाल्याचे चुकीचे दाखवण्यात आले असे निदर्शनास आणून दिल्यानंतर व त्याचप्रमाणे गुन्ह्यांमध्ये तपासी अधिकारी यांनी म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी जवळजवळ १००० पानांचे दोषारोपपत्र दाखल केलेले असून दोषारोप पत्रामध्ये आरोपींच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा दिसून येत नसल्याचे युक्तीवादामध्ये सांगितल्याने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे माननीय न्यायमूर्ती एस. जी. मेहेरे यांनी अर्जदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. पुण्यामध्ये नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅक यांनी अंध व्यक्ती त्याचप्रमाणे भिकारी व अल्पवयीन व्यक्तींनाही कर्ज वितरित झाल्याचे वृत्तपत्रांमध्ये नमूद केलेले आहे. प्रकरणांमध्ये आरोपींच्याव तीने ॲड. एन. बी. नरवडे यांनी काम पाहिले. याबाबत आपली प्रतिक्रिया देताना बँक बचाव समितीचे शिलेदार तथा अर्बन बँक माजी संचालक राजेंद्र गांधी म्हणाले कि, शेवगाव बनावट सोनेतारण घोटाळा हा तेथील गोल्ड व्हॅल्यूअरने केलेला आहे. त्याला बँकेतूनच मदत झालेली आहे. पोलीस तपास प्रगतिपथावर आहे. ज्यांचे नांवावर सोनेतारण कर्ज लिहलेले आहे त्यातील अनेकांना यामधील काहीही माहिती असणेची शक्यता नाही. गोल्ड व्हॅल्यूअर कोणाची नांवे घेतो किंवा घेतली असतील ते महत्वपूर्ण राहणार आहे. माननीय न्यायालयाचा वरील निकाल बरोबर आहे. पडद्यामागचे सूत्रधार उघडे होणारच आहेत.